मुंबई : सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकलमध्ये एका प्रवाशावर चोरीच्या उद्देशाने चार जणांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. हा हल्ला परतावून लावतानाच एका चोराला पकडण्याची कामगिरीही प्रवासी विजय वाघधरे (५३) यांनी केली. वाघधरे हे मंत्रालयात एका विभागात साहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून काम करतात. या घटनेत एका महिलेसह आणखी दोन आरोपींचा शोध सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांकडून घेतला जात आहे.

विजय वाघधरे हे करी रोड येथे राहतात. सकाळी मंत्रालयात जाण्यासाठी करी रोड स्थानकातून सीएसएमटीला जाणारी लोकल पकडली.  वाघधरे ज्या डब्यात होते, त्या डब्यात एक महिला व तीन पुरुष बसले होते. . मशीद रोड स्थानक सोडल्यानंतर लोकल गाडीला सीएसएमटीजवळच सिग्नल मिळाला. गाडी थांबताच डब्यातील एका इसमाने वाघधरे यांना वेळ विचारली. वाघधरे यांनी घड्याळात पाहून वेळ सांगितली, परंतु त्यांना काहीसा संशय आल्याने ते डब्यातील दुसऱ्या आसनावर बसले. त्याचवेळी चौघांनी येऊन त्यांच्याजवळील मोबाइल, गळ्यातील सोन्याची चेन व पाकीट देण्याची मागणी के ली. मात्र त्यांच्या मागणीला वाघधरे यांनी नकार देताच त्यांनी झटापट सुरू के ली. त्यांना चौघांनी मारहाणही करण्यास सुरुवात केली.

लोकल जागेवरून हलताच सोन्याची चेन व पाकिटातील पाच हजार रुपये घेऊन महिला व दोघे जण उतरून पसार झाले. मात्र या झटापटीत एका आरोपीला वाघधरे यांनी पकडूनच ठेवले. लोकल हळूहळू पुढे सरकत असतानाच बाजूच्या रुळावरूनच सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकलमधील पोलीस व प्रवासी पाहून वाघधरे यांनी मदतीसाठी आरडाओरड के ली. पोलीस व अन्य प्रवाशांनी ते मदतीसाठी याचना करत असल्याचे पाहिले. परंतु दोन्ही लोकल सीएसएमटीच्या दिशेने जात असल्याने पोलीस व अन्य प्रवासीही उतरू शकत नव्हते. तोपर्यंत वाघधरे यांनी आरोपीला पकडूनच ठेवले. अखेर सीएसएमटी स्थानकात दोन्ही लोकल येताच दुसऱ्या डब्यातील प्रवासी व पोलीस तसेच स्थानकातील पोलिसांनीही धाव घेत वाघधरे यांना मदत के ली व आरोपीला पकडले.

याप्रकरणी सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला व आरोपी आसिफ शेख याला अटक के ली असून अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी दिली. या आरोपींवर याआधीही गुन्हे दाखल आहेत. या घटनेत वाघधरे यांना किरकोळ मार लागला आहे.