‘कोमसाप’तर्फे जाहीर सत्कारात कविवर्य पाडगावकरांची कृतज्ञता
‘पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण या आणि अशा कोणत्याही पुरस्कारापेक्षा जास्त मोल तुम्हा रसिकांच्या प्रेमाचे आहे. तुम्ही मराठी कवितेवर, माझ्या कवितेवर आणि पर्यायाने माझ्यावर प्रेम केलेत, मला भरभरून प्रेम दिलेत. या प्रेमाची तुलना कोणत्याही पुरस्काराशी होऊ शकत नाही’, अशी कृतज्ञतापूर्वक भावना पद्मभूषण कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी व्यक्त केली. पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे करण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या जाहीर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कविवर्य प्रा. शंकर वैद्य यांच्या हस्ते झालेल्या या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक होते. हा समारंभ दादर येथील अण्णासाहेब वर्तक सभागृहात शनिवारी संध्याकाळी पार पडला.
मंगेश पाडगावकर यांनी सुरुवातीलाच आपल्या वयाचा उल्लेख केला. वयोमानापरत्त्वे आपले पाय थरथरायला लागले असले, तरी कविता मात्र भक्कम आहे, असेही ते म्हणाले. माझ्या कवितेवर असेच प्रेम करत राहा आणि मला तरुण ठेवा, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी आपल्या ‘गाणे’, ‘सलाम’, ‘या जन्मावर, या जगण्यावर’ आणि ‘शेपूट’ या कवितांचे वाचन केले.
मंगेश पाडगावकर यांनी मराठी साहित्याला आणि कवितेला विविध अंगांनी समृद्ध केले, असे मत प्रा. शंकर वैद्य यांनी मांडले. पाडगावकरांसारखी कविता आता मराठी साहित्यात पुन्हा होणार नाही. प्रत्येकाला आपल्या वहीत मोराचे पीस जपण्याचा छंद असतो. कविच्या वहीतही एक मोराचे पीस असते. पण ते सरस्वतीच्या मोराचे असते, असे ते म्हणाले.
या वेळी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ‘कोमसाप’चे अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर आणि अशोक नायगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.