स्थानकाच्या पूर्वेकडे रिक्षाचालकांची मनमानी आणि बेकायदा खासगी प्रवासी वाहतूक
अनेक खासगी व सरकारी कार्यालये असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत गजबजलेल्या वांद्रे रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील परिसर प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. बेकायदा झोपडय़ा आणि अनधिकृत फेरीवाले यांच्यासोबतच रिक्षाचालकांच्या मनमानीचा अनुभव घेत येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता बेकायदा खासगी प्रवासी वाहतुकीचाही फटका बसू लागला आहे. पूर्वेला स्थानकाबाहेर या रिक्षाचालकांनी एकाच मार्गिकेत थांब्याच्या नावाखाली रिक्षांच्या तीन रांगा केल्याने मागून येणाऱ्या वाहनांचा खोळंबा होत आहे. प्रवाशांशी उद्धटपणे बोलणे, बाहेरून येणाऱ्या रिक्षाचालकांना दमदाटी करणे असले प्रकार वाहतूक पोलिसांसमोर घडत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच आता या ठिकाणी पाच, आठ आसनी अशा वाट्टेल त्या वाहनातून बेकायदा प्रवासी वाहतूक केली जात आहे.
वांद्रे पूर्वेला स्थानकालगत असलेला रस्ता अत्यंत अरूंद आहे. मात्र, याच रस्त्यावर असलेल्या रिक्षा थांब्यावर तीन रांगांमध्ये रिक्षा उभ्या असतात. त्यामुळे त्यांच्या मागून येणाऱ्या चारचाकी वाहने अडकून पडतात. परिणामी संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी होते. अनेकदा रिक्षा ‘बेस्ट’च्या बसथांब्यांवर उभ्या केल्या जातात. त्यामुळे बसथांब्यांवरील प्रवाशांना बस गाठण्यासाठी रिक्षांच्या अडथळय़ांतून जावे लागते. या ठिकाणहून येथून बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. या प्रवाशांकडून २० ते ३० रुपये शेअर भाडे घेण्याऐवजी २५ ते ३० रुपये भाडे घेण्यात येत असल्यानेही हे प्रवासी नाराज आहेत. त्यातच रिक्षाचालक स्थानकातून येणाऱ्या पूलाच्या तोंडाशी उभे राहून प्रवाशांना आपल्या रिक्षेकडे घेऊन जाण्यासाठी आपसातच वाद करतात. ज्या प्रवाशांना रिक्षा पकडायची नसेल त्यांना या रिक्षावाल्यांमधून माग काढून पुढे जाण्याचे दिव्य पार पाडावे लागते.
रिक्षाथांब्यावरील रिक्षाचालकांची अरेरावी ही प्रवाशांपुरतीच मर्यादित नसून उपनगराच्या अन्य भागातून येणाऱ्या रिक्षाचालकांना ते दमदाटी करतात. त्यामुळे हे रिक्षाचालक स्थानकाजवळ सोडण्याऐवजी लांब थांबवतात, याचाही फटका हा प्रवाशांनाच बसतो. बेहरामपाडा, बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्स जवळील महाराष्ट्रनगर, भारतनगर येथील हे रिक्षावाले असून ते अरेरावी करीत असल्याची तक्रार एका रिक्षाचालकाने केली. या रिक्षाचालकांकडून वाहतूक पोलिसांचा खिसा गरम केला जातो, असेही या रिक्षाचालकाने सांगितले.