|| जया पेडणेकर, अक्षय मांडवकर

पालिकेची वाट न पाहता रस्त्यांची डागडुजी

पावसाळय़ात रस्त्यांवर पडणारे खड्डे तात्काळ बुजवून प्रवास निर्विघ्न करण्याऐवजी खड्डय़ांची चुकीची आकडेवारी, रस्त्याच्या ताब्यावरून आरोप-प्रत्यारोप आणि कारवाईचे इशारे देण्यात वेळ घालवणाऱ्या महापालिकेच्या उदासीनतेला आता मुंबईकर पुरते कंटाळून गेले आहेत. पालिकेचे कंत्राटदार येतील आणि रस्ते नीट करतील, याची अपेक्षा न करता अनेक ठिकाणी स्थानिक रहिवासीच रस्त्यावर उतरून खड्डे बुजवताना दिसत आहेत.

तीन वर्षांपूर्वी खड्डय़ांमुळे झालेल्या अपघातात मुलगा गमावल्यानंतर रस्त्यावरील खड्डे स्वत:च बुजवणारे दादाराव बिल्होरे असो की नागरिकांना हाताशी धरून रस्ते व्यवस्थित करणाऱ्या स्वयंसेवी संस्था असोत, मुंबईतील अनेक रस्त्यांवर असे नागरिक सध्या पाहायला मिळत आहेत.

आरे वसाहतीत          राहणाऱ्या बिल्होरे यांच्या १६ वर्षांच्या मुलाचा, प्रकाशचा खड्डय़ामुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. अशी वेळ दुसऱ्या कुणावरही ओढवू नये, यासाठी बिल्होरे यांनी स्वत: हातात फावडे आणि घमेले घेऊन रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात केली. जोगेश्वरी, गोरेगाव, जेव्हीएलआर, मरोळ परिसरातील तब्बल ५७० खड्डे बिल्होरे यांनी आतापर्यंत बुजवले आहेत. त्यांच्या ‘खड्डेमुक्त भारत’ या मोहिमेत आता महाविद्यालयीन विद्यार्थीही सहभागी होत आहेत. काही दिवसांपूर्वीच एन. एल. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह त्यांनी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथील १०० खड्डे एका दिवसात बुजवले. याकामात मरोळ प्रागतिक हायस्कूलमधील १९८५च्या बॅचच्या त्यांच्या आठ मित्रांनीही योगदान दिले.

‘सुरुवातीला वाहनचालक मला पालिकेचा किंवा कंत्राटदाराचा कर्मचारी समजत. वाहतुकीला अडथळा होतो, म्हणून माझ्यावर रागवतही असत. मात्र, आता अनेकांना माझ्या या मोहिमेविषयी समजले आहे. त्यामुळे काही दुचाकीस्वार रस्त्यात थांबून खड्डे बुजवण्यासाठी श्रमदान करतात. आता तर अन्य राज्यांतूनही नागरिक माझ्या या मोहिमेत सहभागी होत आहेत,’ असे बिल्होरे यांनी सांगितले.

वांद्रे येथील इरफान मच्छिवाला आणि मुस्ताद अन्सारी हे दोघेही मित्र गेल्या चार महिन्यांपासून पश्चिम द्रुतगती मार्गासह धारावी, वांद्रे बाजार रोड येथील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम करत आहेत. बिल्होरे यांच्या कामाविषयी आम्हाला कळले. तेव्हा आम्ही स्वत:च खड्डे भरण्याचे ठरविले, असे मच्छीवाला यांनी सांगितले. एप्रिल २०१८ पासून वांद्रे भागातून जाणारा पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी जंक्शन आणि वांद्रे बाजार रोडवरील एकूण ९५ खड्डे भरल्याची त्यांनी सांगितले. खड्डे भरण्यासाठी इरफान रस्त्याच्या कडेला फेकून दिलेला किंवा बांधकाम स्थळावरील सिमेंट-मातीच्या राडारोडय़ाचा वापर करतात. इरफान आणि मुस्ताद हा राडारोडा पिशव्यांमध्ये भरून दुचाकीवरून खड्डे पडलेल्या ठिकाणी आणतात. तो खड्डय़ांमध्ये भरून ते बुजविले जातात.

संस्थांचाही पुढाकार

काही स्वयंसेवी संस्थाही रस्त्यांवरील खड्डे भरण्यात पुढाकार घेत आहेत. कुर्ला सायन मार्गे येणाऱ्या वाहनचालकांसाठी विमानतळाकडे जाणारा एक जवळचा रस्ता आहे. या रस्त्यावर पावलोपावली खड्डे पडले होते. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी वॉचडॉग फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला. आठवडाभरापूर्वी वॉचडॉग फाऊंडेशनने एक टेम्पो भरून राडारोडा आणला आणि रस्त्यावरील खड्डय़ांमध्ये भरून खड्डे बुजविले. त्यानंतर पंधरा दिवसांनी पालिकेने या ३०० ते ४०० मीटरच्या रस्त्याचे बांधकाम केले, असे वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्री पिमेंटा यांनी सांगितले.