बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राचा वाद

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्राला त्यांचा मुलगा जयदेव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे १८ जुलैपासून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वकिलांकडून जयदेव यांची उलटतपासणी घेण्यात येणार आहे.

न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर जयदेव यांनी दाखल केलेल्या दाव्याची सोमवारी सुनावणी झाली. त्या वेळेस १८ जुलै रोजी उद्धव यांच्या वकिलांतर्फे जयदेव यांची उलटतपासणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

यापूर्वी, जयदेव यांच्या विरोधात उद्धव यांच्या वतीने तीन साक्षीदार तपासण्यात आले. त्यात बाळासाहेब यांचे इच्छापत्र तयार करणारा वकील, बाळासाहेबांवर उपचार करणारे डॉ. जलील परकार आणि बाळासाहेबांच्या इच्छापत्रावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करणारे शिवसेना नेते अनिल परब यांची साक्ष नोंदवण्यात आली. इच्छापत्र तयार करतेवेळी बाळासाहेबांची मानसिक स्थिती चांगली होती आणि त्यांनी विचारपूर्व इच्छापत्र तयार केल्याचे या तिघांच्या साक्षीतून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही भावांना तडजोडीने वाद मिटवण्याचा सल्लाही दिला होता. मात्र त्याला नकार देण्यात आला. यामुळे १८ जुलैपासून जयदेव यांची उलटतपासणी होईल.