पश्चिम रेल्वेमार्गावरील उपनगरीय प्रवाशांना जलद प्रवासाचे गाजर म्हणून दाखवण्यात आलेल्या चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गाला अखेर रेल्वे मंत्रालयाने कात्री लावली आहे. चर्चगेटहून थेट उन्नत रेल्वेमार्ग उभारण्यासाठी लागणारी जागा उपलब्ध होणे शक्य नाही, असे निदर्शनास आल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मात्र आता त्याऐवजी वांद्रे किंवा अंधेरी येथून हा उन्नत रेल्वेमार्ग विरापर्यंत उभारण्यात येईल, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले. वांद्रे किंवा अंधेरी येथून तयार होणाऱ्या या उन्नत रेल्वेमार्गामुळे ‘मेट्रो-३’ व ‘मेट्रो-१’ यांना जोडणी मिळणार आहे.
मुंबईकरांचा रेल्वेप्रवास सुखाचा करण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक आकर्षक घोषणा करण्यात आल्या. त्यात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल उन्नत रेल्वेमार्ग आणि चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्ग यांचा प्रमुख समावेश होता. त्यापैकी चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्गासाठी आतापर्यंत दोन ते तीन वेळा सर्वेक्षणही करण्यात आले होते. हा मार्ग उभारण्यात दक्षिण मुंबईतील जागेची वानवा हा मुख्य मुद्दा होता.

मेट्रोमुळे उपयुक्तता कमी
राज्य सरकारने कुलाबा ते सीप्झ या दरम्यान मेट्रो-३ या प्रकल्पाची घोषणा केली. पश्चिम रेल्वेवरील सध्याच्या गर्दीला हा सशक्त पर्याय ठरणार असल्याने पश्चिम रेल्वेवरील या उन्नत मार्गाची उपयुक्तता बऱ्यापैकी कमी झाली. मात्र वांद्रे व सीप्झपर्यंत जाणाऱ्या मेट्रो-३ला रेल्वेमार्गाची जोडणी मिळावी, यासाठी आता रेल्वे मंत्रालयाने चर्चगेट-विरार उन्नत रेल्वेमार्ग अंधेरी अथवा वांद्रे येथून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचे सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. वांद्रे येथे हार्बर मार्ग उन्नत आहे. तसेच वांद्रे स्थानकाच्या आसपास मोकळ्या जागेचीही वानवा आहे. त्यामुळे हा मार्ग अंधेरी येथूनच बांधण्यात येईल, अशी शक्यता रेल्वेतील एका बडय़ा अधिकाऱ्याने व्यक्त केली.