चलन वैदेही फायनान्स कंपनीचे; चौघे गजाआड, ऑडी कार हस्तगत

वांद्रय़ाच्या शासकीय वसाहतीत बुधवारी खेरवाडी पोलिसांनी एका ऑडी कारमधून तब्बल दोन कोटींच्या जुन्या नोटा हस्तगत केल्या. ही रोकड वैदेही फायनान्स कंपनीची असून ऑडी कार कंपनीचे मालक राजेश धनुकर यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही रोकड अदलाबदलीसाठी स्वीकारणाऱ्या चौघांना खेरवाडी पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. न्यायालयाच्या परवानगीने या प्रकरणी तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक सोहन कदम यांना ऑडी कारबाबत माहिती मिळाली होती. या कारमध्ये मोठय़ा प्रमाणात जुन्या नोटा आहेत, त्यांची अदलाबदल होणार आहे, असेही त्यांना समजले होते. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कदम व पथकाने बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शासकीय वसाहतीत सापळा रचला. पांढऱ्या रंगाची ऑडी कार पथकाला दिसली. ती अडवून झाडाझडती घेतली असता डिक्कीत ट्रॅव्हलर बॅग आढळली. त्यात पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटांची बंडले आढळली. मोजदाद करता या नोटा दोन कोटींहून अधिक भरल्या. कारमध्ये विनोद अनंत देसाई, सचिन अश्विन सुमारीया, इम्तीयाज मुलाणी, सुरेश कुंभार अशा चार व्यक्ती आढळल्या.

त्यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान ही रोकड वैदेही फायनान्स कंपनीची असल्याचे समोर आले. त्यानुसार चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक पाटील यांनी लोकसत्ताला सांगितले. जुन्याच्या नव्या करण्यासाठी ही रोकड इथून तिथे फिरत होती, असा संशय आहे. आमचा तपास सुरू आहे, अशी प्रतिक्रिया परिमंडळ आठचे उपायुक्त वीरेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केली.