गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि पश्चिम उपनगरातील वाहतुकीचा प्रश्नावर रामबाण उपाय ठरणाऱ्या वांद्रे-वसरेवा या ९.८९ किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू प्रकल्पाला बुधवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने मान्यता दिली. त्यामुळे या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेचाही मार्ग खुला झाला आहे.
मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी पश्चिम उपनगरांतून थेट दक्षिण मुंबईपर्यंत सागरी सेतूंची मालिका बांधण्याचे सरकारने ठरवले होते. वांद्रे-वसरेवा सागरी सेतू बांधण्याचे काम डिसेंबर २००९ मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आले. ऐन निवडणुकांच्या तोंडावर मुंबईकरांना खुष करण्यासाठी या प्रकल्पास मान्यता देण्यात आली असून  निविदा प्रक्रीयाही सुरू करण्यास एमएसआरडीसीला सांगण्यात आले आहे.