26 February 2021

News Flash

नीरव मोदीसाठी मुंबई मध्यवर्ती कारागृहात ‘बराक क्रमांक १२’चा कक्ष

युकेमधून नीरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याची थेट या तुरुंगात रवानगी केली जाणार आहे.

संग्रहित छायाचित्र

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १३ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीसाठी ऑर्थर रोड येथील मुंबई मध्यवर्ती कारागृहात एक उच्च सुरक्षा असलेली खोली अर्थात ‘बराक नं. १२’ तयार ठेवण्यात आली आहे. युकेमधून नीरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यानंतर त्याची थेट या तुरुंगात रवानगी केली जाणार आहे. राज्याच्या गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिल्याचे टाईम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे.

जर नीरव मोदीला मुंबई मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येणार असेल तर सुरक्षेबाबत या कारागृहाची स्थिती काय आहे आणि त्या ठिकाणी कोणत्या सुविधा पुरवण्यात येतात याची माहिती कारागृह विभागाने गेल्या आठवड्यात गृहमंत्रालयाला दिली होती. याच माहितीबाबत नुकतीच केंद्र सरकारनेही राज्य सरकारकडे याबाबत विचारणा केली होती.

नीरव मोदीला युकेच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमध्ये १९ मार्च रोजी अटक केली होती. त्यानंतर भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, युकेच्या वेस्टमिनस्टर कोर्टाने गेल्या महिन्यात त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तसेच त्याला इंग्लंडमधील सर्वाधिक कैद्यांची गर्दी असलेल्या वान्डसवर्थ येतील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, अशाच प्रकारे स्टेट बँकेला ९ हजार कोटींचा गंडा घालून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण झाल्यास तुरुंगात कुठल्या सुविधा आहेत याबाबतचा अहवाल राज्याने गेल्यावर्षी केंद्राला दिला होता. सध्या ‘बराक नंबर १२’ मधील एका खोलीत तीन गुन्हेगारांना ठेवण्यात आले आहे. तर दुसरी खोली सध्या रिकामी आहे. जर मल्या आणि मोदी या दोघांचे प्रत्यार्पण झाले तर या दोघांनाही एकाच खोलीत ठेवण्यात येऊ शकते, असेही गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

२० फूट बाय १५ फूट आकाराची ही खोली असून यामध्ये ३ फॅन, ६ ट्युबलाईट्स आणि २ खिडक्या आहेत. युरोपिअन नियमांनुसार, नीरव मोदीला या खोलीत वैयक्तिक ३ चौरस मीटरचा भाग वापरता येईल. तसेच त्याला एक कापसाची गादी, उशी, बेडशीट आणि ब्लॅंकेट पुरवण्यात येईल. तसेच त्याला केवळ व्यायामासाठी आणि दिवसभरात एक तासापर्यंत या खोलीबाहेर फिरता येईल. त्याचबरोबर पुरेसा प्रकाश, खेळती हवा आणि त्याच्या वस्तू ठेवण्यासाठी एक लॉकरही देण्यात येईल. त्याला दररोज स्वच्छ पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, टॉयलेट आणि बाथरुम सुविधा देण्यात येतील, असेही संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 6:46 pm

Web Title: barak no 12 room ready for the absconding nirvav modi at mumbai central jail aau 85
Next Stories
1 भरतीमुळे समुद्रात अडकली नवी कोरी कार, बीच राईडचा मोह पडला महागात
2 मुंबईजवळून जाणार ‘वायू’ चक्रीवादळ; दोन दिवस मुसळधार
3 ‘हिंमत असेल तर रोखून दाखवा’, रिक्षाचालकाची पोलीस कर्मचाऱ्याला मुंडकं छाटण्याची धमकी
Just Now!
X