News Flash

सर्वत्र मतांची फाटाफूट!

विधान परिषद निवडणुकीत भाजपचा शिवसेनेला धक्का

Vidhan Parishad, भाजपचा शिवसेनेला धक्का
मुंबईतील दोन जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली.

विधान परिषद निवडणुकीत भाजपचा शिवसेनेला धक्का; बुधवारी मतमोजणी
विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील सात जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानात राज्यात सर्वत्रच मोठय़ा प्रमाणावर मतांची फाटाफूट झाली. पक्षाच्या निष्ठेपेक्षा ‘लक्ष्मीदर्शन’ महत्त्वाचे ठरल्याने उमेदवारांना कोटय़वधी रुपयांची उधळण करावी लागली. मुंबईत शिवसेनेला मतदान करण्याचे आश्वासन दिलेल्या भाजपने ऐनवेळी पाठ फिरवून धक्का दिल्याच्या चर्चेने शिवसेनेच्या गोटात संतप्त प्रतिक्रिया उमटली.
मुंबईतील दोन आणि कोल्हापूर, नगर, सोलापूर, धुळे-नंदुरबार आणि बुलढाणा-अकोला-वाशिम या पाच मतदारसंघांमध्ये एकूण २६२२ मतदारांपैकी २५८५ मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी होणार आहे. राज्यसभेसाठी खुल्या मतदानाकरिता भाजप सरकार यापूर्वी सत्तेत असताना दुरुस्ती करण्यात आली होती. विधान परिषदेसाठी अजूनही गुप्त मतदान असल्याने मोठय़ा प्रमाणावर घोडेबाजार होऊन नगरसेवक, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या सदस्यांनी स्वतचे उखळ पांढरे करून घेतले. पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ही शेवटची संधी असल्याने अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींनी पक्षनिष्ठा बाजूला ठेवून ‘लक्ष्मीदर्शना’ला प्राधान्य दिले होते. मतदारराजाचे समाधान करण्याकरिता उमेदवारांनाही ‘सढळ हाता’ने तिजोरी रिती करावी लागली. सातही मतदारसंघांपैकी सर्वाधिक जास्त खर्च कोल्हापूरमध्ये झाला आहे. काँग्रेसचे सतेज पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर महादेव महाडिक हे दोघेही तगडे उमेदवार रिंगणात असल्याने मतदारांनीही संधी सोडली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या सर्वच पक्षांना फुटीचे ग्रहण या मतदारसंघात लागले आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या भूमिकेनुसार काँग्रेसने नगर आणि सोलापूरमध्ये मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईत राष्ट्रवादीने मदत केल्याने या दोन्ही मतदारसंघांमघ्ये काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला.

भाजपची राष्ट्रवादीच्या बंडखोराला मदत?
* मुंबईतील दोन जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सेना उमेदवार रामदास कदम यांनाच पहिल्या पसंतीची मते दिली जातील, असे भाजपने जाहीर केले होते.
* शिवसेनेकडे पुरेशी मते असल्याने भाजपच्या मतांची आवश्यकता नव्हती. पण भाजपच्या आश्वासनामुळे सेनेचे नेते निश्चिंत होते. प्रत्यक्षात भाजपने सेनेला मते दिलीच नाहीत.
* ‘भाजपने का मते दिली नाहीत हे भाजप नेत्यांनाच विचारा,’ असे सांगत रामदास कदम यांनी संतप्त भावना व्यक्त केली. भाजपने राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड यांच्या पारडय़ात मते टाकल्याचे समजते.
* काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळ येऊ नयेत हे आमचे उद्दिष्ट आहे. दोन काँग्रेसमध्ये भांडणे लागावीत या उद्देशानेच दिल्लीच्या पातळीवर निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपच्या एका बडय़ा नेत्याने दिली.
* भाजप, समाजवादी पार्टी, अपक्ष आणि राष्ट्रवादीतील काही मतांच्या जोरावर प्रसाद लाड यांना निवडून आणण्याची खेळी भाजपने केली.
* या गोंधळामुळे दुसऱ्या जागेवर काँग्रेसचे भाई जगताप किंवा प्रसाद लाड यांच्यापैकी कोणी जास्त मते फोडली असतील यावर त्यांचे भवितव्य ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2015 2:41 am

Web Title: be votes division
Next Stories
1 जोशींच्या इच्छापत्राचे संघटनांकडून स्वागत!
2 ‘रोबोयुद्धा’त त्रिमिती प्रिंटरची बाजी!
3 मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक
Just Now!
X