सुरक्षा उपाययोजनांमुळे वाढीव खर्च; सौंदर्योपचार दरांमध्ये वाढ

मुंबई : टाळेबंदी शिथिल करताना ब्युटी पार्लर, सलूनला परवानगी देण्यात आली असली, तरी करोना संसर्गाच्या भीतीने ग्राहकांकडून प्रतिसाद नसल्याने या व्यवसायाला उभारी मिळालेली नाही. घरून काम, रद्द झालेले लग्नसोहळे, विविध कार्यक्रम यामुळे सौंदर्योपचारांकडे कल कमी आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने काही प्रमाणात प्रतिसाद मिळेल, अशी आशा या सेवा क्षेत्राला अद्यापही आहे.

राज्य सरकारने टाळेबंदी शिथिल करताना ब्युटी पार्लर, सलूनला सशर्त परवानगी दिली. मात्र, एक महिना उलटूनही करोनाची लागण होईल या भीतीने ग्राहकांचा कमी प्रतिसाद असल्याचे ब्युटी पार्लर व्यावसायिकांचे म्हणणे आहे. करोना संक्रमण दरम्यान सुरक्षा उपाययोजनांमुळे ब्युटी पार्लर आणि सलूनचालकांनी सौंदर्योपचारांमध्ये १०० ते २०० रुपयांनी वाढ के ली आहे. सातत्याने निर्जंतुकीकरण, त्वचेशी संपर्क येणारे सौंदर्योपचार टाळणे, ग्राहकांची आगाऊ नोंदणी आदी खबरदारी घेतली जात आहे. तर प्रतिबंधित क्षेत्रातील वा गंभीर आजार असलेल्या ग्राहकांना प्रवेश देण्यास मनाई केली आहे. काही ब्युटी पार्लर ग्राहकांच्या गरजेनुसारच खुली ठेवली जात आहेत.

‘ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही काही दिवसच ब्युटी पार्लर सुरू ठेवतो. त्वचेशी थेट संपर्क येणारे फे शियल, ब्लीचिंग, क्लीन अप हे सौंदर्योपचार कमी प्रमाणात होत आहेत, असे ‘इमेज ब्युटी पार्लर’च्या प्रमुख भक्ती शिंदे यांनी सांगितले.

ग्राहकांच्या कमी प्रतिसादापायी वीजदेयक, दुकान भाडे सुटत नसल्याने महिला चालकांनी पर्यायी उत्पादनांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. भाग्यश्री सोनावणे यांच्याकडे आता आठवडय़ाला १० ते १२ महिला येतात. त्यातून त्यांची चार ते पाच हजार रुपयांची कमाई होते. मात्र हे उत्पन्न अपुरे असल्याने त्यांनी आता महिलांचे कपडे, अंतर्वस्त्र, दागिन्यांची विक्री सुरू केली आहे.

करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती कधी पूर्ववत होईल याची शाश्वती नाही. ग्राहकांच्या मनातून करोनाबद्दलची धास्ती जाण्यास अजून काही महिने लागतील, असे घरोघरी जाऊन सौंदर्योपचार करणाऱ्या स्मिता वाडेकर यांनी सांगितले.

स्पा अजूनही प्रतीक्षेत

सरकारने ब्युटी पार्लर, सलून यांना परवानगी दिली असली तरीही स्पा अजूनही बंदच आहेत. दत्तप्रसाद राणे यांचे डोंबिवलीत ‘स्पॅब्युलस’ नावाचे स्पा आहे. सध्या अनेक ग्राहक घरूनच काम करत असल्याने त्यांना पाठदुखी, मानेचे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून स्पा कधी सुरू करणार याची सतत विचारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या करोना काळात सुरक्षेच्या उपाययोजनांची चित्रफीत केली असून ती ग्राहकांना पाठवली आहे. स्पा सुरू झाल्यावर ग्राहकांनी निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील, असे त्यांनी सांगितले.

सौंदर्यप्रसाधनांचे नुकसान

अनेक सौंदर्यप्रसाधनांची मुदत संपल्याने ती वाया गेल्याचे ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी सांगितले. एप्रिल ते जून हा लग्नसोहळे तसेच कार्यक्रमांसाठी व्यस्त असा कालावधी असतो. त्यामुळे आम्ही अधिकची उत्पादने मागवली होती. मात्र, टाळेबंदीमुळे ही उत्पादने पडून होती. परिणामी काही उत्पादने फे कून द्यावी लागली, असे भाग्यश्री सोनावणे म्हणाल्या.