गोवंश हत्याबंदीनंतर अन्य प्राण्यांच्या हत्याही बंद करण्याचा विचार केला जाईल, या अ‍ॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांनी उच्च न्यायालयात केलेल्या निवेदनावरुन गदारोळ झाल्यावर  ‘सरकारने केवळ गोवंश हत्याबंदी केली असून अन्य प्राण्यांची हत्या बंद करण्याचा सध्या कोणताही विचार नाही,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. त्यामुळे मांसाहार प्रेमींना दिलासा मिळाला असला तरी सरकारपुढे मात्र कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. क्रूरपणे होणारी प्राणीहत्या रोखण्यासाठीच गोवंश हत्याबंदी केल्याचा सरकारचा दावा न्यायालयात कायदेशीरदृष्टय़ा टिकणे कठीण होणार असल्याने गोवंश हत्याबंदी कायदाच अडचणीत आला आहे.
गोवंश हत्याबंदी ही धार्मिक कारणांवरुन करण्यात आली नसून क्रूरपणे प्राणी हत्या होऊ नये, या हेतूने करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. गोवंश हत्याबंदी धार्मिक कारणावरुन केली की क्रूरपणे प्राणीहत्या रोखण्यासाठी करण्यात आली, याची आता न्यायालयीन छाननी होत असल्याने राज्य सरकारची अडचण झाली आहे. गोवंश हत्याबंदी धार्मिक कारणावरुन केल्याचे मान्य केल्यास हिंदुत्वाची कास धरल्याचा प्रचार सुरू होईल, अशी सरकारला भीती आहे. तर क्रूरपणे प्राणीहत्या रोखण्यासाठीच ही बंदी लागू केल्याचे कायद्यातच नमूद केल्याने तेवढीच भूमिका ठेवल्यास अन्य प्राण्यांची हत्या का रोखणार नाही, हा भेदभाव नाही का, या न्यायालयाच्या प्रश्नावर सरकार निरुत्तर आहे. त्यामुळे गोवंश हत्याबंदीचा कायदा कायदेशीरदृष्टय़ा न्यायालयात टिकणेही कठीण होणार असल्याची चिन्हे आहेत.
अ‍ॅडव्होकेट जनरलच्या निवेदनावरुन खळबळ माजल्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हा मुद्दा मंगळवारी उपस्थित करण्यात आला. अन्य प्राण्यांच्या हत्या रोखणार नाही आणि मांस खाण्यावर कोणतेही र्निबध येणार नाहीत, अशी ग्वाही मांसाहारप्रेमींना देत मुख्यमंत्र्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला व अ‍ॅडव्होकेट जनरलचे वक्तव्य प्रसिद्धी माध्यमांनी चुकीचे दिल्याचे खापरही फोडले.
गोवंश हत्याबंदीची मागणी ही मुख्यत्वे धार्मिक कारणावरुन करण्यात आली होती. गाय ही हिंदू धर्मात पवित्र असून केवळ गायींचीच नाही, तर बैलाचीही हत्या होऊ नये, अशी मागणी हिंदूुत्ववादी व अन्य संघटनांकडून झाली होती.

शिवसेनेचाही तीव्र विरोध
कोंबडय़ा, बकरे यासह अन्य प्राण्यांचे मांस खाणे रोखण्यास शिवसेनेचाही तीव्र विरोध आहे. वांद्रे येथील पोटनिवडणुकीतही हा मुद्दा शिवसेनेला अडचणीत आणू शकतो. तसा प्रचारही सुरू करण्यात आला होता.
********
* मातोश्री’वरुन सूचना आल्याने शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे व विधानसभेत सुनील प्रभू यांनी तातडीने हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमत्र्यांनी अन्य प्राण्यांच्या हत्या रोखण्याचा  विचार नसल्याचे स्पष्ट केले.
*वाघांना खाद्य उरले नाही म्हणून जंगलात गाई बांधून ठेवण्याचा अजब प्रकार नागपूरलगतच्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात सुरू झाला आहे.
*सरकारच्या गोहत्या बंदीच्या घोषणेला अजून महिनाही पूर्ण झालेला नसताना, अभयारण्य प्रशासनाने या निर्णयावर केलेला पलटवार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
* प्रसारमाध्यमांमध्ये ही बाब पसरल्याने आता वनखात्याकडून सावरासावर केली जात आहे.