मुंबईत एका कॅब ड्रायव्हरसोबत घातलेला वाद एका माणसाच्या अंगलट आला आहे. कारण या वादामुळे या माणसाला एका कंपनीत मिळत असलेली सीईओची नोकरी गमवावी लागली आहे. CEO च्या पदासाठी लागणारा अनुभव आणि शिक्षण दोन्हीही त्याच्याकडे होतं मात्र टॅक्सी चालकासोबत झालेल्या वादामुळे त्याचं कंपनीत सीईओ होण्याचं स्वप्न भंगलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, सीईओ पदाच्या नोकरीसाठी हा माणूस टॅक्सीने कंपनीत चालला होता. त्याचवेळी पाऊस सुरु झाला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीमुळे त्याचं टॅक्सीचालकासोबत भांडण झालं. अशी भांडणं मुंबईत खरंतर दररोज होतात. मात्र याच भांडणामुळे या माणसाला सीईओच्या पदाची नोकरी गमवावी लागली. कारण या माणसाला त्याच्या ऑफिसमध्ये सोडल्यावर टॅक्सीचालकाने त्याची तक्रार त्या कंपनीकडे केली. ही तक्रार मॅनेजमेंटने गांभीर्याने घेतली.

एखादा माणूस जर पाऊस आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांमुळे आपला स्वतःवरचा ताबा सोडून टॅक्सी चालकाशी भांडतो. तर मग असा माणूस सीईओ पदी बसला तर तो रोज समोर येणारी आव्हानं आणि समस्या यांना कसं काय तोंड देऊ शकेल? एवढ्या मोठ्या कंपनीत त्याला सीईओ पद दिलं तर तो संकटांना सामोरा कसा जाईल? याचा विचार मॅनेजमेंटने केला. त्याचमुळे या माणसाला सीईओ पद द्यायचं नाही असा निर्णय मॅनेजमेंटने घेतला.

आजकाल मोठ्या कंपन्या महत्त्वाच्या पदावर कुणालाही नेमण्याआधी त्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती घेत असते. आपण ज्याला महत्त्वाचे पद देतो आहोत त्याच्याकडे नेतृत्त्व गुण आहेत की नाही? यासोबतच त्याची लाईफस्टाईल कशी आहे? तो फिटनेसला महत्त्व देतो का? हे सगळे पाहिले जाते आता एका माणसाला सीईओचा जॉब एका भांडणामुळे गमावावा लागला आहे.