शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘देवदास’ या चित्रपटात शाहरुखच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या अवा मुखर्जी यांचे निधन झाले. वयाच्या ८८व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिलेल्या अवा मुखर्जी यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. चित्रपटांसोबतच त्यांनी जाहिराती आणि छोट्या पडद्यावरही मोलाचे योगदान दिले.

अवा मुखर्जी यांनी १९६३ मध्ये एका बंगाली चित्रपटातून अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली. तारु मुखर्जी दिग्दर्शित ‘राम ढाका’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर २००० मध्ये ‘स्निप’ या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. पुढे २००२ मध्ये अवा यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ या चित्रपटात शाहरुखच्या आजीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

राम गोपाल वर्मा यांच्या ‘डरना जरुरी है’ या चित्रपटातही त्या झळकल्या होत्या. २००९ मध्ये अवा यांची मुलगी रोमिला मुखर्जी दिग्दर्शित ‘डिटेक्टिव नानी’ या चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळाल्या. अवा मुखर्जी यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून सोशल मीडियावरही त्यांना अनेक कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.