News Flash

‘बेस्ट’ची डबलडेकर कालबा होणार?

नव्या दुमजली बस घेण्याबाबतचा निर्णय अद्याप

वर्षभरात १२० पैकी ७२ गाडय़ा भंगारात; नव्या दुमजली बस घेण्याबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित

मुंबई : मुंबईची खास ओळख असलेली बेस्टची दुमजली बस कालबाह्य़ होण्याच्या मार्गावर आहे.  बेस्टच्या ताफ्यात असलेल्या १२० दुमजली बसगाडय़ांपैकी ७२ गाडय़ा येत्या वर्षभरात भंगारात काढाव्या लागणार असल्याचे बेस्ट प्रशासनाने आपल्या अर्थसंकल्पीय अंदाजात म्हटले आहे. त्या जागी नव्या दुमजली बसगाडय़ा घेण्याबाबत मात्र बेस्टचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे येत्या काही वर्षांत दुमजली बस इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.

उंचावरून धावती मुंबई कशी दिसते त्याचा नजारा दाखवणारी दुमजली बस म्हणजे खरेतर मुंबईची ओळखच! मुंबईबाहेरून आलेल्या प्रत्येकालाच या दुमजली बसचे आकर्षण असते.  दुमजली बसच्या वरच्या मजल्यावरील पहिली जागा पकडण्यासाठी आजही प्रवाशांमध्ये स्पर्धा असते. पूर्वी मुंबईत सर्रास दिसणारी दुमजली बस आता काही ठरावीक मार्गावरच धावते. आधीच आर्थिक खाईत गेलेल्या बेस्टला या दुमजली बसचा खर्च परवडेनासा झाला आहे. यामुळे दुमजली बसच्या अस्तित्वाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १९३७ मध्ये पहिली दुमजली बस ताफ्यात दाखल होती. १५ वर्षांपूर्वी बेस्टकडे ९०१ दुमजली बस गाडय़ा होत्या. मुंबई शहरच नव्हे तर उपनगरातील मुलुंड दहिसपर्यंत या गाडय़ा धावत होत्या, तर काही काळ त्या नवी मुंबईतील सी बी डी बेलापूपर्यंतही धावत होत्या. मात्र गेल्या काही वर्षांत मुंबईत मोनो, मेट्रो सुरू झाल्या. अनेक ठिकाणी पूल स्काय वॉक बांधले गेले त्यामुळे दुमजली बस मुंबईत चालवणे मुश्कील होऊ  लागले आहे. त्यामुळे सध्या दुमजली गाडय़ांचा ताफा कमी होऊन आता केवळ १२० गाडय़ा उरल्या आहेत.

दुमजली बसगाडय़ांचा खर्च परवडत नसल्यामुळे बंद करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.  या गाडीसाठी दोन वाहक द्यावे लागतात. गाडीचे इंजिन डिझेलवर चालणारे असून एक लिटरमागे केवळ अडीच किमी अंतर कापले जाते. तसेच या इंजिनची देखभाल काही ठरावीक डेपोमध्येच होते. साध्या बसमध्ये ७० प्रवासी (४८ बसलेले, २० उभे) मावतात. तर दुमजली बसमध्ये ९० प्रवासी मावतात. त्यामुळे केवळ २० अधिक प्रवाशांसाठी बस चालवणे परवडणारे नसल्याचा प्रशासनाचा युक्तिवाद आहे.

ठराव मोडीत

कालबाह्य झालेल्या दुमजली बसगाडय़ा वेळोवेळी काढून टाकल्या, पण त्या जागी नवीन गाडय़ा घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे काही वर्षांपूर्वी बेस्ट समितीमध्ये अक्षरश: ठराव करून या गाडय़ांना जीवदान दिले. बेस्टच्या ताफ्यामध्ये किमान दोनशे गाडय़ा दुमजली हव्यात, असा ठराव बेस्ट समितीने आधीच मंजूर केला आहे. त्यामुळे सध्या असलेल्या गाडय़ा काही वर्षांनी कालबाह्य ठरल्या तरी पुन्हा दुमजली गाडय़ा प्रशासनाला घ्याव्या लागणार आहेत.

सध्या मोजक्याच मार्गावर वाहतूक

सध्या बेस्टच्या ताफ्यात १२० दुमजली बसगाडय़ा आहेत. केवळ छोटय़ा बसमार्गावरच या गाडय़ा धावतात. कुलाबा, कुर्ला, वरळी, मजास आणि धारावी या आगारांमधून या गाडय़ा धावतात. केवळ कुलाबा ते वरळी ही १२४ क्रमांकाची बस सर्वात मोठय़ा मार्गावर धावते.

दुमजली गाडय़ांना अपघात

दुमजली गाडय़ांना आजवर अपघातही झाले आहेत. पंधरा-वीस वर्षांपूर्वी प्रभादेवी रवींद्र नाटय़गृहाजवळ आणि दीड वर्षांपूर्वी वांद्रे कलानगर येथे बस वळवताना बस पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी वांद्रे कुटुंब न्यायालयाजवळ झालेल्या विचित्र अपघातात दुमजली बसच्या वरच्या मजल्याचे छप्पर पूर्णपणे सोलवटून निघाले. त्यामुळे दुमजली गाडीच्या सुरक्षेबाबत नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्यामुळे सध्या तरी छोटय़ा मार्गावर या गाडय़ा चालवल्या जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 2:00 am

Web Title: best iconic double deckers bus to go off roads in a year zws 70
Next Stories
1 ४७५० कोटींची पालिकेला आस!
2 प्राथमिक फेरीतील अपयशानंतरही एकांकिकेची तालीम
3 मोकाट मांजरांचे महिनाभरात निर्बीजीकरण
Just Now!
X