‘बेस्ट’ समितीच्या दैनंदिन पासदरातील वाढ कमी करण्याच्या प्रस्तावास महापालिका सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. शहर आणि उपनगरासाठी आता अनुक्रमे ५० व ४० रुपये असे दैनिक पासाचे दर राहणार आहेत.

‘मॅजिक पास’ (वातानुकूलित नसलेल्या बस)मधील अमर्यादित मासिक पासाची रक्कम १ हजार ७०० रुपयांवरून ती शहरासाठी ९७५ तर उपनगरातील प्रवासासाठी १ हजार २०० रुपये करण्यात आली आहे. त्रमासिक पासासाठी शहर आणि उपनगरात ही रक्कम अनुक्रमे २ हजार ८२५ व ३ हजार ४५७ रुपये इतकी असणार आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘बेस्ट’ प्रशासनाने सहा प्रमुख ठिकाणी रात्रभर सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बसमार्ग क्रमांक १, ७ मर्यादित, २१ मर्यादित तसेच क्रमांक ४४, ६३ व ६६ या मार्गावर रात्रभर बसगाडय़ा चालविण्यात येणार आहेत. ‘बेस्ट’ प्रशासनाने तयार केलेल्या ‘सार्वजनिक गणेशोत्सव माहिती पुस्तिका २०१५’ चे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले. बेस्टची वीज जोडणी, जादा बसगाडय़ा याची माहिती यात देण्यात आली आहे.