देवनार आगारातील जागा भाडेतत्त्वावर देण्याचा तिढा सुटला

वडाळा आरटीओला वाहन योग्यता तपासणीसाठी बेस्टच्या देवनार आगारातील जागा भाडेतत्त्वावर देण्याचा तिढा सुटलेला आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने आगारातील ७००० चौ.मी. जागा भाडेतत्त्वावर मागितलेली होती. त्यानुसार मंगळवारी बेस्ट समितीने झालेल्या बैठकीत दोन वर्षांसाठी ही जागा भाडेतत्त्वावर परिवहन विभागाला मान्यता दिली. या जागेसाठी ५ लाख रुपये दर महिन्याला भाडे देण्यात यावे, अशी मागणी बेस्ट समिती सदस्यांनी केली होती. ती मागणी परिवहन विभागाने मान्य प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

दरवर्षी रिक्षा, टॅक्सी, खासगी बस, अवजड वाहनांना योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) घेणे आवश्यक असते. या  प्रमाणपत्राशिवाय वाहन धावल्यास त्यावर आरटीओकडून कारवाईचा बडगा उचलला जातो. मात्र आरटीओत यासाठी जागाच नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांच्या वार्षिक योग्यता तपासणीसाठी आरटीओत २५० मीटरच्या चाचणीसाठी ट्रॅक उभारणे आवश्यक आहे. मात्र मुंबईतील आरटीओंना यासाठी जागा मिळवताना बरीच धडपड करावी लागत आहे.

वडाळा आरटीओला वहन योग्यता तपासणीसाठी स्वतंत्र जागा अद्यापही उपलब्ध नाही. त्यामुळे शिवाजी नगर देवनार आगारातील ७ हजार चौ.मी. जागा पाच वर्षांच्या भाडेतत्त्वावर प्रति महिन्याला २ लाख रुपये भाडे देण्याची तयारी दर्शविलेली होती. परंतु बेस्ट समितीने पाच लाख रुपये भाडे द्यावे, अशी मागणी करत प्रस्ताव फेटाळला होता. पाच वर्षांपेक्षा दोन वर्षांचा करार करा, अशी मागणी मंगळवारी झालेल्या बैठकीत बेस्ट समिती सदस्यांनी केली.

बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांनी परिवहन आयुक्तांशी चर्चा करून पाच लाख रुपये भाडे करण्यास सांगितले. परंतु पाच वर्षांवरून दोन वर्षेच जागा भाडेतत्त्वावर घेण्याची परिवहन विभागाने मागणी केली. त्यानुसार दोन वर्षांसाठी ही जागा परिवहन विभागाला पाच लाख रुपये महिन्याला भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. सध्या ही जागा मोकळी आहे.

३१ लाख रुपयांच्या महसुलावर पाणी

१० सप्टेंबर इंधन दरवाढीविरोधात राजकीय पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. बंददरम्यान बेस्ट बसगाडय़ांवर दगडफेकीच्याही घटना घडल्या. हे नुकसान होतानाच बेस्टचा महसूलही बुडाला जवळपास ३१ लाख रुपयांच्या महसुलावर बेस्टला पाणी सोडावे लागल्याचे समितीच्या बैठकीत प्रशासनाकडून सांगण्यात आले.