राज्य वीज नियामक आयोगाचा निर्णय, ऑनलाइन वीज देयके भरणाऱ्यांस विशेष सवलत

मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाने बुधवारी मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या तीन आणि मुंबईतील उपनगरांसह राज्यात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या वीज दरवाढ प्रस्तावावर निर्णय देताना वीजदरात कपात करत बेस्टच्या वीजग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. तर महावितरणच्या वीजदरात सध्या सरासरी ५ टक्के दरवाढ लागू करताना १२ हजार ३८२ कोटी रुपयांची दरवाढ तूर्तास लांबणीवर टाकली आहे. नवीन दर १ सप्टेंबर २०१८ पासून लागू होतील.

वीज वितरण कंपन्यांच्या वार्षिक दरवाढ प्रस्तावावरील निकाल वीज नियामक आयोगाने  जाहीर केले. मुंबई शहर परिसरात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्टचे वीजदर ५ ते ७ टक्के कमी करण्यात आले आहेत, तर मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. (पूर्वीची रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर) यांच्या वीजदरात सरासरी १ टक्का वाढ करण्यात आली आहे. महावितरणने ३४ हजार ६४६ कोटी रुपयांची म्हणजेच २३ टक्के दरवाढ मागितली होती. पण आयोगाने केवळ २० हजार ६५१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सध्या त्यातील ८२६८ कोटी रुपये सरासरी ५ टक्के दरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांकडून वसूल करण्याची परवानगी महावितरणला दिली आहे, तर उर्वरित १२ हजार ३८२ कोटी रुपये नियामक मालमत्ता म्हणून गृहीत धरण्यात येतील म्हणजेच त्या दरवाढीबाबत नंतर विचार होईल, असे राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी सांगितले. राज्यातील मीटरवरील कृषिपंपांचा वीजदर ३.३५ रुपये प्रति युनिट होता. तो २० पैशांनी वाढवून ३.५५ रुपये केल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठीच्या चार्जिग केंद्रासाठी प्रति युनिट ६ रुपये असा दर निश्चित केल्याचेही त्यांनी जाहीर केले.

महावितरणच्या दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांची वीज २४ पैशांनी (४.८ टक्के) महाग झाली आहे. सध्या ५.०७ रुपये प्रति युनिट वीजदर होता. तो आता ५.३१ रुपये झाला आहे. तर १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या ग्राहकांसाठीचा वीजदर ८.७४ रुपये होता. तो २१ पैशांनी (२.४० टक्के) वाढून ८.९५ रुपये झाला आहे.

त्याचबरोबर उच्चदाब औद्योगिक ग्राहकांसाठी महावितरणचा वीजदर ८.०४ रुपये प्रति युनिटवरून ८.२० रुपये झाला आहे. टाटाचा वीजदर ९.१२ रुपयांवरून वाढून ९.३८ रुपये झाला आहे. याउलट बेस्टचा औद्योगिक वीजदर ८.६५ रुपयांवरून ८.०६ पैसे इतका कमी झाला, तर अदानीचा दर १०.०७ रुपयांवरून ९.३७ रुपये इतका कमी झाला आहे.

कृषिपंपांचा वीजवापर तपासणार

राज्यातील कृषिपंपांचा वीजवापर महावितरण वाढवून दाखवते असा आरोप होत असतो. त्यावरून यंदाही सुनावणीत ग्राहक प्रतिनिधींनी, शेतकऱ्यांनी नाराजी नोंदवली आहे. त्यामुळे या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी कृषिपंपांचा वीजवापर मोजण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत कृषिपंपांची तपासणी करण्यात येईल. लवकरच संस्था नेमली जाईल व पुढील दरवाढीआधी त्याचा अहवाल मागवला जाईल, असे वीज नियामक आयोगाचे सचिव अभिजित देशपांडे यांनी जाहीर केले.

अदानीच्या दरवाढीतील तरतुदी

अदानीच्या घरगुती ग्राहकांचा वीजदर दरमहा १०० युनिटपर्यंत ४.३३ रुपये होता. तो आता ४.५० रुपये झाला आहे. १ एप्रिल २०१९ पासून तो ४.७७ रुपये होईल. १०१ ते ३०० युनिटपर्यंत ७.६४ रुपये होता व तो आहे तितकाच ठेवण्यात आला आहे. १ एप्रिल २०१९ पासून तो ७.९० रुपये होईल. ३०१ ते ५०० युनिटपर्यंत दर ९.७० रुपये होता तो कमी होऊन ९.२९ झाला आहे. १ एप्रिल २०१९ पासून तो आणखी कमी होऊन ९.०८ रुपये होईल.

वीज आयोगाच्या आदेशाची वैशिष्टय़े

* नेटबॅंकिंग, क्रेडिट-डेबिट कार्ड, भीम अ‍ॅप यासारख्या विविध डिजिटल बॅंकिंग व्यवस्थेचा वापर करून वीजबिल भरणाऱ्यांना एकूण रकमेच्या पाव टक्के सूट देण्याचा आदेश राज्य वीज नियामक आयोगाने सर्व वीज वितरण कंपन्यांना दिला आहे. ही सूट घरगुती व इतर लघुदाब ग्राहकांसाठी असून महिन्याला कमाल ५०० रुपयांपर्यंत सूट मिळेल.

* लॉंड्री दुकानाला आता वाणिज्यिक दराऐवजी नवीन विशेष दर लागू होईल. त्यामुळे या व्यवसायातील लोकांना वीजदरात सवलत मिळेल. मुंबई शहर व उपनगरात प्रति युनिट ७५ पैसे ते २ रुपयांपर्यंत दिलासा मिळणार आहे.

* कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणाऱ्यांना वाणिज्यिकऐवजी सार्वजनिक सेवा या गटातील वीजदर लागू होईल. त्यामुळे प्रति युनिट ७० पैसे ते २ रुपयांचा दिलासा त्यांना मिळेल. असा प्रकल्प एखाद्या गृहनिर्माण सोसायटीत असल्यास त्यास निवासी वीजदर लागू होईल.

बेस्टचे दर घटले

बेस्टच्या ग्राहकांचे वीजदर सरासरी ५ ते ७ टक्के कमी झाले आहेत. कारण यापूर्वी परिवहन विभागाच्या तोटय़ापोटी वीजग्राहकांवर लावलेल्या आकाराच्या वसुलीचे पैसे परत करण्याची रक्कम आयोगाने निश्चित केली आहे. २०१८-१९ साठी ती रक्कम ९३८ कोटी रुपये असून २०१९-२० साठी ती रक्कम ८५१ कोटी रुपये आहे. ग्राहक गट आणि वीज वापरानुसार प्रति युनिट परतावा दर निश्चित करण्यात आले आहेत.

टाटाच्या दरवाढीतील प्रमुख तरतुदी

टाटाच्या ग्राहकांना सरासरी ४ टक्के दरवाढ लागू होईल. तर १ एप्रिल २०१९ पासून आणखी २ टक्के दरवाढ लागू होईल. टाटाच्या घरगुती ग्राहकांचा वीजदर दरमहा १०० युनिटपर्यंत ३.८४ रुपयांवरून ४.३३ रुपये झाला आहे. १ एप्रिल २०१९ पासून तो ४.५३ रुपये होईल. १०१ ते ३०० युनिटपर्यंत ७.०२ रुपये होता. तो आता ७.५० रुपये झाला आहे. १ एप्रिल २०१९ पासून तो ७.६६ रुपये होईल. ३०१ ते ५०० रुपयांपर्यंत तो ११.०५ रुपये होता. आता तो ११.४८ रुपये झाला आहे. तर १ एप्रिल २०१९ पासून तो १२.१६ रुपये होईल.

उच्च दाब औद्योगिक वीजदर

वीज कंपनी     जुने दर (प्रति युनिट)    नवीन दर (प्रति युनिट)

टाटा पॉवर      ९ रु. १२ पैसे                       ९ रु. ३८ पैसे

अदानी           १० रु. ०७ पैसे                     ९ रु. ३७ पैसे

बेस्ट               ८ रु. ६५ पैसे                        ८ रु. ०६ पैसे

महावितरण      ८ रु. ०४ पैसे                       ८ रु. २० पैसे

उच्च दाब वाणिज्यिक वीजदर

वीज कंपनी     जुने दर (प्रति युनिट)    नवीन दर (प्रति युनिट)

टाटा पॉवर       ९.७१ पैसे                      ९ रु. ९० पैसे

अदानी          १० रु. ७६ पैसे                   १०रु. ०५ पैसे

बेस्ट                ९रु. १७ पैसे                   ८ रु. ५६ पैसे

महावितरण      १३ रु. ४७ पैसे               १३ रु. ८० पैसे