भाभा अणू संशोधन केंद्रातील (बीएआरसी) महिला वैज्ञानिक अखेर शुक्रवारी स्वगृही परतली असून वरिष्ठांच्या मानसिक जाचाला कंटाळून घर सोडल्याचे तिने यापूर्वी तिच्या भावाला ई-मेलमार्फत कळवले होते. ती पुद्दुचेरी येथे गेली होती, तेथून ती पुन्हा नवी मुंबई येथील स्वतच्या घरी परतली. तिचा जबाब नोंदवणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

बीएआरसी येथे कनिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेली बबिता सिंग ही २३ जानेवारीला आपल्या नवी मुंबईतील नेरुळ येथील घरातून न सांगता निघून गेली होती. घरातून निघण्यापूर्वी तिने आपल्या भावाला आणि सहकाऱ्यांना एक ई-मेल पाठवला होता. ज्यात ‘बीएआरसी’मधील वरिष्ठांकडून मानसिक त्रास होत असल्याचा तिने उल्लेख केला होता.

पुद्दुचेरी येथील आश्रमात

घर सोडल्यावर माध्यमांमध्ये आपल्याबद्दल बातम्या येत असल्याचे पाहिल्यावर तिने आपल्या भावाला २६ जानेवारीला फोन करून सांगितले की, मी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पुद्दुचेरी येथील एका आश्रमात आले आहे. यानंतर तिने घरी यायचा निर्णय घेतल्यावर ती शुक्रवारी घरी परतली. या प्रकरणी तिचा जबाब नोंदविणार असून कार्यालयातील वरिष्ठांवर तक्रार दाखल करणार की नाही हा निर्णय तिच्यावर सोडण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.