‘पर्यावरण दिना’च्या निमित्ताने ‘भामला फाऊंडेशन’तर्फे झालेल्या पर्यावरण जनजागृती सोहळ्याला राजकीय आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी हजेरी लावली होती.
पर्यावरणसंवर्धनाबाबत तरुणांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी दर वर्षी ५ जूनला ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त ‘भामला फाऊंडेशन’तर्फे कार्यक्रम पार पडला. या वेळी राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम, आमदार आशीष शेलार, काँग्रेस नेत्या प्रिया दत्त, खासदार पूनम महाजन यांसह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. वांद्रे येथील कार्टर रोडवरील ‘एम्फी थिएटर’ येथे हा कार्यक्रम झाला. याशिवाय अभिनेता जॅकी श्रॉफ, विवेक ऑबेरॉय आदी बॉलीवूड कलावंतांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या वेळी समाजसेविका आनंदिनी ठाकूर आणि शामा कुलकर्णी तसेच पर्यावरणाचे अभ्यासक डायरेल डिमोंटी यांचा सत्कार करण्यात आला.
गायिका सुनिधी चौहान, गायक शान, कुणाल गांजावाला, आदित्य नारायण, तॉची रैना यांनी या वेळी गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गीतकार प्रसून जोशी यांनी पर्यावरण विषयावरील कविता सादर केली. या वेळी उपस्थितांना ५०० रोपांचे वाटप करण्यात आल्याचे फाऊंडेशनचे आसिफ भामला यांनी सांगितले. तसेच अनेक सामाजिक संस्थांनी या वेळी पर्यावरणाविषयीची विविध प्रदर्शने उभारली होती. सायकल रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.