कर्मचाऱ्यांकडून उत्तरपत्रिका घेऊन त्या सोडवून पुन्हा परत देण्याचा प्रताप करणाऱ्या ८० विद्यार्थ्यांची नावे मुंबई विद्यापीठाने भांडुप पोलिसांना कळविली आहे. हे सर्व विद्यार्थी नवी मुंबईतील असून त्यांचे पत्तेही मिळाल्याने आता त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, फरार असलेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आले असून अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कोठडी २७ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.
भांडुप पोलिसांनी विद्यापीठात अभियांत्रिकी शाखेच्या उत्तरपत्रिका १५-२० हजार रुपयांच्या बदल्यात मिळवून त्या घरी सोडवून पुन्हा परीक्षा विभागात पाठविणाऱ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला असून त्यात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आले आहे. आरोपींकडून पोलिसांनी ९७ उत्तरपत्रिका जप्त केल्यानंतर त्यावर असलेल्या क्रमांकाच्या आधारे हे कोणत्या विद्यार्थ्यांचे आहेत, त्यांची नावे आणि पत्ते पोलिसांनी विद्यापीठाकडे मागितले होते. विद्यापीठाने ही माहिती पोलिसांकडे सुपूर्द केली असून एकूण ८० विद्यार्थ्यांची यादी पोलिसांना देण्यात आली आहे. ही सर्व मुले नवी मुंबईतील असून त्यांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

 

बाल शिपायांचे यश
मुंबई : बारावीचा निकाल लागल्यानंतर शहरभरात उत्साह असताना मुंबई पोलीस आयुक्तालयात आपले पाल्य उत्तीर्ण झाल्याचा आनंद अधिकारी-कर्मचारी पेढे वाटून व्यक्त करत होते. मात्र, आयुक्तालयात पेढे वाटणाऱ्या दोन विद्यार्थी सर्वाचेच लक्ष वेधून होते. बालशिपाई म्हणून कार्यरत असलेल्या सम्राट चौगुले आणि सौरभ यांनी अनुक्रमे ५२ आणि ५६ टक्के मिळवले असून सकाळी महाविद्यालय आणि दुपारपासून सायंकाळपर्यंत आयुक्तालयात काम करत दोघांनीही कमावलेल्या गुणांची प्रशंसा होत आहे.
मुंबई पोलीस दलात सेवेवर असताना मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांच्या मुलांना बालशिपाई म्हणून पोलीस आयुक्तालयात रुजू करुन घेतले जाते. या बालशिपायांना हलके प्रशासकीय काम दिले जाते, त्यासाठी त्यांना दर महिन्याला मानधनही दिले जाते.
माटुंग्याच्या खालसा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत असलेला सम्राट पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्या कार्यालयात काम करतो. पोलीस सहआयुक्त (प्रशासन) अनुप कुमार सिंग यांच्या कार्यालयात काम करणारा सौरभ डुंबरे ठाण्याच्या ब्राह्मण शिक्षण मंडळ महाविद्यालयात शिकतो. त्याला प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे आहे.