‘फॅशन शो’च्या आयोजनामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या ताब्यातून भायखळा येथील भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय काढून घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाबाबत केलेला करार पालिका सभागृहाने शुक्रवारी संपुष्टात आणून जमनालाल बजाज फाऊंडेशनला दणका दिला. परिणामी हे वस्तुसंग्रहालय पालिकेच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र तूर्तास सहा महिने या वस्तुसंग्रहालयाची जबाबदारी जमनालाल बजाज फाऊंडेशनकडेच राहणार आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय दुरुस्तीच्या निमित्ताने २००३ मध्ये जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या ताब्यात देण्यात आले होते. पालिका सभागृहाने १६ जानेवारी २००३ रोजी त्यास संमतीही दिली होती. त्यानंतर वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापनासाठी विश्वस्त मंडळ स्थापन करण्यात आले. मात्र या विश्वस्त मंडळाला विश्वासात न घेता फाऊंडेशनने वस्तुसंग्रहालयाचा कारभार एकहातीपणे हाकण्यास सुरुवात केली.  फाऊंडेशनने अलीकडेच वस्तुसंग्रहालयात लॅक्मे फॅशन शोचे आयोजन केले होते. वस्तुसंग्रहालयातील फॅशन शो मनसेने आंदोलन करून उधळून लावला. परिणामी फाऊंडेशनच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका मुख्यालयातील त्यांच्या दालनात शुक्रवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. पालिकेने फाऊंडेशनबरोबर वस्तुसंग्रहालयाबाबत केलेला करार रद्द करण्यावर या बैठकीत एकमत झाले. वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी गटनेत्यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या समितीला सहा महिन्यांमध्ये आपला अहवाल सादर करावा लागणार आहे. जमनालाल बजाज फाऊंडेशनबरोबर झालेला करार रद्द करण्याचा आणि गटनेत्यांची समिती स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी पालिका सभागृहात शुक्रवारी मांडला. त्यास सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी पाठिंबा दिला. आता पालिकेने फाऊंडेशनबरोबर केलेला करार मोडीत निघणार आहे. मात्र गटनेत्यांची समिती अहवाल सादर करेपर्यंत म्हणजे पुढील सहा महिने वस्तुसंग्रहालयाचे व्यवस्थापन या फाऊंडेशनच्याच ताब्यात राहणार आहे.