माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचे सनदी लेखापाल सारखेच असून ज्या रीतीने संबंधित सनदी लेखापालाने भुजबळांना रोख रकमेच्या बदल्यात धनादेश मिळवून दिले,  तशीच मदत तटकरे यांनाही केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सनदी लेखापालाचा जबाब नोंदविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी सक्तवसुली महासंचालनालयाला दिलेल्या पत्रात केली आहे.

वाटेगावकर यांनी मे. काकडे इन्फ्रास्टक्चर आणि मे. आरव्हीआरसीएल यांच्या संयुक्त निविदेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कशी मदत केली याबाबत उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी मे. काकडे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने भुजबळ कुटुंबीयांना दिलेल्या दहा कोटींचा उल्लेख केला आहे. हा उल्लेख समीर  यांच्या रिमांड अर्जात सक्तवसुली महासंचालनालयाने केला होता. त्याची  प्रत त्यांनी याचिकेत जोडली आहे.