केवळ एकाच संस्थेकडून प्रतिसाद

देश-विदेशी पर्यटक आणि मुंबईकरांना सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर सायकल सफर घडावी या उद्देशाने पालिकेने नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीदरम्यान किनाऱ्यालगत सुरू केलेला सायकल मार्गिका उपक्रम प्रायोजकांनी पाठ फिरविल्यामुळे अडचणीत सापडला. हा उपक्रम चालविण्यासाठी संस्थांना आवाहन करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली. मात्र पालिकेच्या आवाहनाला केवळ एकाच संस्थेकडून प्रतिसाद मिळाला असून या संस्थेला हा उपक्रम राबविण्यास देण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे.

नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीदरम्यानच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मार्गावर सकाळी ६ ते ११ या वेळेत सायकल मार्गिकेसाठी जागा राखून ठेवण्यात आली. हॅण्डल बार या संस्थेने प्रायोजकत्व स्वीकारल्यानंतर ३ डिसेंबर २०१७ पासून सायकल मार्गिका सुरू झाली. या संस्थेने तीन महिने हा उपक्रम राबविला. या तीन महिन्यांमध्ये मोठय़ा संख्येने नागरिकांनी सायकल सफरीचा आनंद लुटला. दरम्यानच्या काळात या उपक्रमाचे प्रायोजकत्व स्वीकारलेली संस्था आणि वाहतूक पोलीस यांच्यात काही खटके उडाले. तसेच हॅण्डल बारला सायकल मार्गिका चालविण्यासाठी दिलेली तीन महिन्यांची मुदत संपुष्टात आली आणि हा उपक्रम बंद पडला.

नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीदरम्यानचा नियोजित सायकल मार्गिका उपक्रम पुनरुज्जीवित करण्यासाठी १८ एप्रिल रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून प्रायोजकत्व स्वीकारण्याचे आवाहन संस्थांना करण्याची वेळ पालिकेवर ओढवली. हा उपक्रम राबविण्यासाठी आयोजक, स्वयंसेवी संस्था, नामांकित नाममुद्रा, संस्थांनी अर्ज करावे, असे आवाहन पालिकेने जाहिरातीच्या माध्यमातून केले होते. अर्ज सादर करण्यासाठी २१ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती.   या उपक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत शनिवारी संपुष्टात आली. मात्र केवळ एकच अर्ज पालिकेला प्राप्त झाला आहे. रेडिओ मिर्ची या संस्थेने हा उपक्रम राबविण्याची इच्छा अर्जाद्वारे व्यक्त केली आहे.

पालिकेने नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटीदरम्यान सुरू केलेल्या सायकल मार्गिकेला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नवा प्रायोजक नेमून पावसाळ्यापर्यंत सायकल मार्गिका उपक्रम राबविण्यात येणार आहे.    – किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय