कठुआ बलात्कार प्रकरणी काय प्रतिक्रिया देणार? हे सगळे प्रकरण अत्यंत घृणास्पद आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे असे मत महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले आहे. मला या प्रकरणाबद्दल बोलण्याचीही दहशत वाटते इतके हे प्रकरण लांछनास्पद आहे असेही त्यांनी म्हटले आहे. अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर या दोघांचाही ‘102 Not Out’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. तर अमिताभ बच्चन हे बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेचे ब्रँड अँबेसेडरही आहेत.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन हे दोघे एकत्र आले होते. यावेळी अमिताभ बच्चन यांना कठुआ बलात्कार प्रकरणी प्रश्न विचारला गेला. त्यानंतर या सगळ्या प्रकरणावर बोलण्यासही आपल्याला दहशत वाटते असे हताश उद्गार अमिताभ बच्चन यांनी काढले आहेत. कठुआ प्रकरणावर या आधी अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. शबाना आझमी यांनी मंगळवारीच बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहीमेसाठी मुली जिवंत राहणे गरजेचे आहे असे म्हणत कठुआ प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्याआधी करीना कपूर, फरहान अख्तर, सोनम कपूर, अक्षय कुमार, रिचा चढ्ढा, कल्की कोचीलीन या आणि यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी कठुआ बलात्कार प्रकरणी आपल्या प्रतिक्रिया देत हे सगळे प्रकरण चीड आणणारे आहे असे म्हटले आहे.

जम्मू काश्मीरमधील कठुआ या ठिकाणी एका ८ वर्षांच्या मुलीवर सात दिवस बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची अत्यंत क्रूरपणे दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या सगळ्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले.