उमाकांत देशपांडे लोकसत्ता

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था आणि गरज भासल्यास विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपने राज्यभरात संघटनेच्या जिल्हानिहाय ६९ प्रभारींच्या नियुक्त्या केल्या आहेत. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे व सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करण्याचे उद्दिष्ट असून अन्य जिल्ह्य़ांतील नेत्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

करोना संकटकाळात भाजपकडून मदतकार्य सुरू असले तरी संघटना बांधणीसाठीही पावले टाकली जात आहेत. त्यासाठी दररोज वेगवेगळ्या पातळ्यांवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका होत आहेत. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच केल्या. त्याचबरोबर आता ६९ जिल्हा प्रभारीही नेमण्यात आले आहेत. जिल्हाध्यक्षांबरोबरच त्या जिल्ह्य़ाबाहेरील नेत्यावरही आता प्रभारीपदी नियुक्त करून जबाबदारी देण्यात आली आहे.

जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, त्यांचे कामकाज, वादविवाद मिटवून संघटनेचे काम वाढविणे, अशा जबाबदाऱ्या प्रभारींवर देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर स्थानिक महत्त्वाचे प्रश्न प्रदेश पातळीवरील नेत्यांपर्यंत पोचविणे, आंदोलने करणे यावरही भर दिला जाणार आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असून स्वबळावरच स्थानिक स्वराज्य संस्थांसह पुढील निवडणुकांना सामोरे जावे, असा पक्षात मतप्रवाह आहे. त्यामुळे त्या  पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे.