प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विश्वास

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांच्या बैठकीत सरकार स्थापनेसाठी किमान समान कार्यक्रमावर सहमती होत असली तरी अखेर सरकार भाजपचेच येईल, असा विश्वास महाराष्ट्रातील नेत्यांना वाटत आहे. त्यांची सारी मदार केंद्रीय नेतृत्वावर आहे.

राज्यातील राजकीय परिस्थिती आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या कार्यक्रमासाठी भाजपचे आमदार, पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक दादर येथील वसंतस्मृती या मुंबई भाजपच्या मुख्यालयात सुरू आहे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या. या बैठकांत राज्यातील संघटनात्मक निवडणुकांबाबत पक्षाचे राष्ट्रीय निर्वाचन अधिकारी राधामोहन सिंह यांनी मार्गदर्शन केले. तर राज्यातील सद्यस्थितीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले.

भाजपचे १०५ आमदार निवडून आले असून अपक्षांसह ११९ आमदार भाजपकडे आहेत. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल. भाजपला वगळून सरकार स्थापन होऊ शकत नाही, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपला वगळून सरकार स्थापन होऊ शकत नसल्याचा पुनरुच्चार केला.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सत्तास्थापनेच्या वाटाघाटी सुरू असल्या तरी वैचारिक समानता नसल्याने हे समीकरण जुळणे कठीण आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिल्लीतील नेतृत्व या सत्तासमीकरणावर राजी होण्यात अनेक अडचणी आहेत.

शिवसेनेचे हिंदुत्व हा काँग्रेससाठी राष्ट्रीय पातळीवर डोकेदुखीचा विषय ठरेल. अशा काही वादाच्या मुद्यांवर काँग्रेसचे केंद्रीय नेते महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार स्थापन करण्यास तयार होणार नाहीत, असा भाजपच्या नेत्यांचा कयास आहे.

नरेंद्र मोदी, अमित शहांवर मदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकीय कौशल्यामुळे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नियोजित आघाडीचे गाडे रूळावरून घसरेल आणि अखेरीस भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच महाराष्ट्रात स्थापन होईल, असा भाजप नेत्यांचा कयास आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा भाजपच्या ताब्यातून  महाराष्ट्र सहजासहजी जाऊ देणार नाहीत. ते दोघे योग्यवेळी समीकरणे जुळवतील, अशी भाजप नेत्यांना आशा आहे.