माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील कारवाईपासून बोध घेण्याचा सूचक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना दिला असला तरी स्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांपेक्षा अन्य पक्षातून आयात झालेल्यांची कामे करतानाच भाजपचे मंत्री हैराण झाले असून त्यांनी ही आपली कैफियत मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री सर्व मंत्र्यांशी आपल्या निवासस्थानी प्रदीर्घ चर्चा केली. त्या वेळी खडसेंवर झालेल्या कारवाईवरून बोध घ्या, कक्ष अधिकाऱ्यापासून सचिवापर्यंत अधिकाऱ्यांनी एखाद्या प्रकरणात नकारात्मक अभिप्राय नोंदविले असतील, तर ते बदलून निर्णय घेऊ नका. कोणताही निर्णय घेताना अडचणीत येणार नाही याची खबरदारी घ्या, अशा महत्त्वाच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना दिल्या. त्या वेळी काही मंत्र्यांनी आपलीही कैफियत मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. स्वपक्षीय नेते, कार्यकर्ते एखादे काम घेऊन आले आणि ते नियमात बसणारे नसल्याचे सांगितले तर हे कार्यकर्ते समजून घेतात. मात्र अन्य पक्षातून आलेले आणि आता भाजपमध्ये असलेले नेते आणि कार्यकर्ते मुरब्बी आहेत. विशेषत: काँग्रेस, राष्ट्रवादीतून आलेल्या नेते, कार्यकर्त्यांना आपली कामे कशी करून घ्यावीत याचा ‘दांडगा अनुभव’ असल्याने त्यांचाच दबाव अधिक असतो, असे काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले.