शिवसेनेकडून आज निर्णयाची शक्यता

मुंबई : पूजा चव्हाण या युवतीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी संशयाची सुई असलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर शिवसेनेच्या नेतृत्वाकडून उद्या निर्णय अपेक्षित आहे. दुसरीकडे, राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेत सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज रोखण्याचा इशारा दिला आहे.

संजय राठोड यांची गच्छंती अटळ असली तरी शिवसेनेने अद्याप अधिकृतपणे काहीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राठोड प्रकरण महाविकास आघाडी सरकारला त्रासदायक ठरू शकते. यातूनच पूजा चव्हाण मृत्यूची चौकशी पूर्ण होईपर्यंत संजय राठोड यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या तोंडावर राठोड यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो. महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीने राठोड यांना पदावर कायम ठेवण्यावर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीची भूमिका मुख्यमंत्र्यांना कळविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी के ले. अधिवेशन सुरळीत पार पाडायचे असल्यास राठोड यांना मंत्रिपदावरून दूर करावे, असाच सूर महाविकास आघाडीत आहे. शिवसेनेत मात्र राठोड यांना मंत्रिपदावरून दूर करण्यावर दोन मतप्रवाह आहेत.

भाजपचे आंदोलन

पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांची निष्पक्षपातीपणे चौकशी करून त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजप प्रदेश महिला मोर्चाकडून शनिवारी राज्यभर ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले.  राज्यात १०० ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. सुमारे २० हजार महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड येथे निदर्शने करण्यात आली.

गुन्हा दाखल करा-चित्रा वाघ

नाशिक : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ढळढळीत पुरावे असूनही सरकारने वनमंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध अद्याप कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप करत राठोड यांची तत्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पतीचा छळ करीत आहे. मी तुम्हाला पुरून उरेल, असा इशाराही त्यांनी दिला.

‘…अन्यथा कामकाज चालू देणार नाही’

कोल्हापूर :संजय राठोड यांचा सोमवारपर्यंत राजीनामा घ्यावा. अन्यथा या प्रकरणी  सरकारला विधिमंडळात तोंड उघडू देणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. आमदार पाटील म्हणाले, संजय राठोड यांच्यावर कारवाई का केली जात नाही, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या प्रकरणी गप्प का बसले आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेच्या उपसभापती – शिवसेना नेत्या नीलम गोºहे यांनी बोलले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.