शिवसेनेने विचारसरणी बदलेली नाही आणि शिवसैनिक देशाचा पंतप्रधान झाला तर आनंदच होईल, असे सूचक विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आता राष्ट्रीय राजकारणात रस घेणार असल्याचे संकेत दिले. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यभरातील पक्षाचे नेते-उपनेते, प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. यावरून भाजपा नेते नितेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. पहिले मुंबईत पुढचा महापौर तरी बसवा, असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

“पहिले पुढचा शिवसेनेचा मुंबईचा महापौर तरी बसवा. पंतप्रधान तर लांबच राहिले. जय महाराष्ट्र!!” असं म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर टीका केली.

आणखी वाचा- शिवसैनिक पंतप्रधान झाल्यास आनंदच!

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

“विश्वास ठेवणे हा आमचा दुबळेपणा नव्हे तर संस्कृती आहे. ‘प्राण जाए पर वचन न जाए’ ही आमची संस्कृती आहे. शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. शिवसेनेशी राजकारण करण्याचा प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे मी ठरवले. त्यामुळेच मुख्यमंत्रिपद स्वीकारले. अन्याय सहन करू नका, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला,” असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

विचारसरणीत बदल नाही!

शिवसेनेने विचारसरणी बदलेली नाही. शिवसेना कुणापुढेही लाचार होणार नाही, अशी ग्वाही देत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व व मराठी माणसाच्या मुद्दय़ापासून पक्ष दूर जाण्याची शिवसैनिकांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक संकटात शिवसैनिक धावून जात आहेत. चक्रीवादळ असो की करोनाचे संकट, शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी उभा असल्याचेही ठाकरे म्हणाले.