देशात आणि राज्यात सुरू असलेल्या करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. लॉकडाउनमधून अत्यावश्यक सेवांना मात्र वगळण्यात आलं आहे. बेस्टलादेखील अत्यावश्यक सेवांमध्ये सामिल करण्यात आल्यानं बेस्टची सेवाही सुरू आहे. अशा परिस्थितीत काही बेस्ट कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी काही मागण्या केल्या होत्या. “बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्हालाही मानवतेच्या भावनेतून त्यांच्यासोबत आंदोलनात उतरावं लागेल,” असा इशारा भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी दिला आहे. आतापर्यंत बेस्टच्या १०८ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

“बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा. मुंबईकरांचे जीव वाचविणारे योद्धे म्हणून कार्यरत असणारे बेस्ट कर्मचारी आता स्वतःसाठी लढत आहेत. तर त्याचं ऐकायला हवं! त्यांच्या जीविताच्या रक्षणाची हमी महापालिकेने घ्यायलाच हवी. त्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आम्हांलाही त्यांच्या आंदोलनात मानवतेच्या भावनेतून उतरावं लागेल,” असं दरेकर म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या ?

बेस्ट कर्मचारी करोनाबाधित झाल्यावर त्याचं आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांचं विलगीकरण करण्यात यावं, प्रत्येक आगारात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून प्रत्येक बेस्ट कामगारांची करोना चाचणी रोज करण्यात यावी, बेस्ट कर्मचाऱ्यांची ने आण करण्यासाठी राखीव व स्वतंत्र बसगाड्या सुरू कराव्यात, करोनाबाधित मात्र कोरोनाचे लक्षण नसलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात यावे आणि तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, करोनाच्या विरोधात लढण्यासाठी कर्तव्यावर उपस्थित असलेले आणि करोनाबाधित होऊन मृत्यूमुखी पडलेले बेस्ट, पालिका व अन्य आस्थापनातील, पोलीस कर्मचारी यांना शहीद दर्जा देऊन इतर सर्व सवलती त्यांना देण्यात याव्यात, अशा अनेक मागण्या बेस्ट उपक्रमाकडे करण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा- गोवंडी शिवाजी नगरमध्ये केंद्रीय सशस्त्र दल तैनात करा – किरीट सोमय्या

‘घरी रहा, सुरक्षित रहा’

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने के ला आहे. त्यामुळेच येत्या सोमवारपासून ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ धोरण अवलंबून बेस्ट सेवा बंद करण्याचा इशारा समितीने गुरुवारी दिला होता. परंतु प्रशासन मात्र ढिम्म असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, वाढत्या संसर्गामुळे बेस्ट कर्मचारी तणावाखाली आहेत. त्यांच्या आरोग्यविषयक मागण्यांवर बेस्ट आणि पालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नसल्याने प्रशासन किती गंभीर आहे, ते दिसते, असे कामगार नेते शशांक राव यांनी सांगितले.