निसर्ग चक्रीवादळानं राज्यातील अनेक भागात थैमान घातलं होतं. त्याचवेळी मुंबईत जोरदार पाऊसही झाला. दरम्यान, एका लोकवस्तीत नाल्यातील पाणी बाहेर आल्याचा व्हिडीओ भाजपाचे नेते आमदार राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर केला आहहे. तसंच मुंबई महानगरपालिकेचा नालेसफाईचा खोटा दावा एका दिवसात उघडल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नाल्यातील पाणी वस्तीत घुसल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच या पाण्यातून दुचाकीही वाहून जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कदम यांनी पालिकेचा नालेसफाईचा दावा एका दिवसात फेल झाला असल्याचं म्हटलं आहे. तसंच आता आम्ही आरोप करतोय असं म्हणू नका. मुख्यमंत्र्यांनी आपल्या डोळ्यांनी हे पाहावं, असं ते म्हणाले.

या व्हिडीओच्या सत्यतेवर काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच हा व्हिडीओ जुना असल्याचा दावाही काही जणांनी केला. त्यांनादेखील राम कदम यांनी उत्तर दिलं आहे. “जुना व्हिडीओ आहे असं म्हणणाऱ्यांना त्या व्हिडीओमधील लोकांच्या चेहऱ्यांवरीला मास्कही दिसू नयेत ? याचं आश्चर्य वाटतं. पाऊस कधी आला. करून दाखवलेला प्रताप चव्हाट्यावर येताच अनेकजण तो झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न का करत आहेत?,” असा सवालही राम कदम यांनी केली.

७० टक्के गाळ काढल्याचा दावा

मुंबईच्या नाल्यातील ७० टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मुंबईत २१५ किलो मीटरचे मोठे १५६ किलो मीटरचे लहान नाले आहेत. तर साधारण १हजार ९८६ किलो मिटरचे नाले आहेत. ३१ मे पर्यंत नालेसफाई पूर्ण करायची आहे. तर जास्तीत ५ ते ७ जूनपर्यंतची मुदत वाढ मिळू शकते.