भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर अडचणीत आलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राजीनाम्याची तयारी दाखवली होती. पण या प्रकरणाची चौकशी होणार आहे. राजीनाम्याची गरज नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. जमीन घोटाळ्याच्या आरोपांनंतर देसाई यांनीही आज सकाळी राजीनामा दिला होता. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांचाही राजीनामा स्वीकारला नाही.

ताडदेव येथील एम. पी. मिल कंपाऊडमधील एस. डी. कॉर्पोरेशन राबवीत असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत विकासकाला अनुकूल भूमिका आणि कांदिवली पूर्व येथील समतानगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित फाइल मंत्री झाल्यानंतर निकालात काढल्याचे आणखी एक प्रकरण समोर आल्यानंतर अडचणीत आलेल्या मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली होती. या प्रकरणांची चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यांच्यासह एमआयडीसीतील जमीन घोटाळा केल्याचा आरोप देसाई यांच्यावर झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासनही फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर सुभाष देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि आज सकाळी फडणवीस यांची भेट घेऊन राजीनामा दिला होता. मात्र, राजीनाम्याची गरज नाही असे सांगून तो स्वीकारण्यात फडणवीसांनी नकार दिला. याबाबत देसाई यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिल्यानंतर आता मेहता यांनीही राजीनाम्याची तयारी दाखवली होती, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत ‘एएनआय’ने वृत्त दिले आहे. मेहता यांनी काल फडणवीस यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची तयारी आहे, असे सांगितले होते. पण या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. राजीनामा देण्याची गरज नाही, असे त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, मेहता, देसाई यांच्यासह काही मंत्र्यांवर वेगवेगळ्या प्रकरणांवरुन गेले काही दिवस अनेक आरोप झाले आहेत. वेगवेगळी प्रकरणे उघड होत आहेत. मेहता यांनी एमपी मिल येथील प्रकरणात ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले होते,’ असा शेराही फाईलवर लिहील्याने गदारोळ झाला होता. त्यानंतर सारवासारव करत काही फाईल्स मुख्यमंत्र्यांकडे नेल्या होत्या, पण त्यात या प्रकरणाची फाईल नव्हती, असे मेहता यांनी सांगितले होते. मात्र मेहता यांच्या वाचविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करीत असून भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या आणि पारदर्शक कारभाराच्या घोषणा वल्गना ठरल्या असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात आला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर परिणाम होऊ लागला व मेहतांची चौकशी करण्यासाठी दबाव येऊ लागला. आता मेहता यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.