पर्यायी व्यवस्था होईपर्यंत इमारतीतच शाळा; तावडे यांचे चौकशीचे आश्वासन

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत जालना जिल्ह्य़ात बांधण्यात आलेल्या आदर्श शाळेच्या (मॉडेल स्कूल) इमारतीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सचिव असलेल्या मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाने बेकायदेशीरपणे घुसखोरी करीत या शाळेवर कब्जा केला आहे. एवढेच नव्हे तर या इमारतीमध्ये आता शाळाही भरविली जात असल्याचे उघडकीस आले असून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे संकेत दिले आहेत. स्वत: दानवे यांनीही याची कबुली दिली असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या इमारतीत शाळा भरविली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत केंद्राच्या प्रकल्प मान्यता मंडळाने राज्यातील १० जिल्ह्य़ांतील शैक्षणिकदृष्टय़ा अप्रगत असलेल्या ४३ गटांमध्ये इयत्ता ६वी ते १२वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींकरिता इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी आदर्श शाळा(मॉडेल स्कूल) मंजूर केल्या. सुमारे ३३१७ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एकमजली ४३ शाळांच्या बांधणीसाठी १२९.८६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानुसार शाळा आणि त्यांची बांधकामेही सुरू करण्यात आली. मात्र केंद्रात झालेल्या सत्तातरानंतर केंद्र सरकारने या योजनेतून अंग काढून घेत पुढील खर्चाचा भार राज्य सरकारवर ढकलला. राज्य सरकारनेही या योजनेला कात्री लावत ऑक्टोबर २०१५ मध्ये जालना जिल्ह्य़ातील घनसावंगी, परतूर, मंठा, भोकरदन (जोमाळा), अंबड, जालना या सहा आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील शाळांची अर्धवट स्थितीतील बांधकामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मात्र या शाळांच्या इमारती तयार होताच त्या आपल्या संस्थांना कशा मिळतील यासाठी मराठवाडय़ातील शिक्षणसम्राटांनी मोर्चेबांधणी सुरू केली. यात रावसाहेब दानवे यांची मोरेश्वर शिक्षण प्रसारक मडळ ही संस्थाही मागे नव्हती. या संस्थेने भोकरदन जोमाळा येथील आदर्श शाळेची इमारत नाममात्र भाडय़ाने आपल्या संस्थेच्या पदरात पाडून घेण्याबाबतचे प्रयत्न ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणल्यानंतर शिक्षण विभागाने परवानगीचा प्रस्ताव रोखला. मात्र त्यापूर्वीच या संस्थेने या शाळेत घुसखोरी करून त्यावर कब्जा केल्याचे समोर आले आहे.

संस्थेने या इमारतीमध्ये मराठवाडा रेसिडन्शियल इंग्लिश स्कूल सुरू केले असून सहावीपर्यंतच्या वर्गात जवळपास ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दानवे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून या शाळेवर केलेला कब्जा चुकीचा असून सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संस्थेवर कारवाई करावी तसेच भाजपनेही दानवे यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जालना जिल्ह्य़ाचे आम आदमी पार्टीचे नेते कैलास फुलारी यांनी केली आहे.

याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना विचारले असता, याबाबत चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दानवेंची भूमिका

याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मराठवाडय़ातील दुष्काळी भागातील गरीब मुलांना शिक्षण मिळावे या सामाजिक बांधिलकीतून ही शाळा सुरू करण्यात आली आहे. या मुलांना पूर्णपणे मोफत इंग्रजी शिक्षण दिले जात असून त्यांना सुविधाही दिल्या जात आहेत. किमान १२वीपर्यंत या मुलांना चांगले शिक्षण देण्याबरोबरच त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी आम्ही ही शाळा सुरू केली असून सध्या जागा कमी पडत असल्याने या शाळेत हे वर्ग भरविले जात आहेत. ही इमारत भाडेतत्त्वावर मिळावी यासाठी आम्ही शासनास प्रस्ताव दिला असून केवळ पर्यायी जागेची व्यवस्था होईपर्यंत या इमारतीमध्ये शाळा भरविली जात असल्याचे त्यांनी सांगितले.