राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यावर पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय राखण्यासाठी कार्यपध्दती ठरविण्यात आली असून केंद्राप्रमाणे राज्यातही ‘चिंतन गट’ (थिंक टँक) स्थापन केला जाणार आहे. पक्षाची ध्येयधोरणे आणि सरकारने कोणती पावले टाकावीत, यासाठी महत्वाच्या बाबींवर सल्ला देण्याचे काम या गटाकडून केले जाणार आहे.
सरकार स्थापन झाल्यावर प्रदेश भाजपची तब्बल सहा तास ‘मॅरेथॉन’ बैठक शनिवारी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अतिथीगृहात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि विस्तारित सुकाणू समितीचे सदस्य, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुध्दे, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, राष्ट्रीय चिटणीस खासदार पूनम महाजन आदी नेते बैठकीस हजर होते. बैठकीत निवडणूक निकालाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. शिवसेनेशी ताणलेले संबंध, राष्ट्रवादीची भूमिका याबाबतही नेत्यांनी भूमिका मांडली.