मुख्यमंत्री फडणवीस विजयाचे शिल्पकार; भाजपच्या जागांमध्ये तिपटीने वाढ

नगरपालिकांची निवडणूक ही राज्य सरकारच्या कामगिरीची चाचणी परीक्षा मानली गेल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची धुरा वाहून शक्तीप्रदर्शन केले. मराठा आरक्षण मोर्चाच्या पाश्र्वभूमीवर भाजपला फटका बसणार नाही, यासाठी रणनीती आखली. राज्य सरकारच्या कामगिरीचे दाखले देत आणि नोटाबंदीचा निर्णय हा काळा पैसा खणून काढण्यासाठी असून तो देशभक्तीशी निगडीत करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचार केला. काही ठिकाणी शिवसेना तर गरजेनुसार अन्य पक्षीयांशीही स्थानिक आघाडय़ांचे राजकारण करुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपचा झेंडा अनेक नगरपालिकांमध्ये रोवला. नगराध्यक्षांच्या थेट निवडणुकीचा सर्वाधिक लाभ भाजपनेच उठविला.

भाजपने ५० हून अधिक नगरपालिकांमध्ये झेंडा रोवला आणि ७५० हून अधिक नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आणले. या निवडणुकीच्या प्रचाराची मुख्य धुरा आणि राजकीय गणिते जुळविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला. नगराध्यक्षांची निवडणूक थेट मतदानातून करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याचा लाभ उठविला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात अगदी पक्षाच्या अधिकृत उमेदवारीचे ए, बी अर्ज देऊन झाल्यावर शिवसेनेशी युती जाहीर करण्यात आली. ती फारशी यशस्वी झाली नाही, मात्र पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाडय़ात जनसुराज्य, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम आदींशी आघाडय़ा केल्या व छुपे समझोतेही केले. शिवसेनेशी युती असली तरी प्रचारात मात्र मुख्यमंत्री फडणवीस किंवा भाजपच्या नेत्यांनी युतीला विजयी करा, यावर भर देण्यापेक्षा भाजपला पूर्ण सत्ता द्यावी व मी विकास घडवून दाखवितो, अशी घोषणा देत मते मागितली.

मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विभागवार बैठका घेऊन निवडणुकीचे नियोजन केले आणि ५० हून अधिक सभा घेतल्या.   मराठा समाजाचे मोठे मोर्चे निघत होते. हा वाद तापविल्यास त्याचा फटका बसेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चेची तयारी दाखवून आर्थिक निकषांवर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्याचा, निवासव्यवस्थेसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. आरक्षणाला पाठिंबा देऊन न्यायालयातही बाजू मांडण्यासाठी पावले टाकली.  राज्य सरकारची दोन वर्षांतील कामगिरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो प्रचाराचा मुद्दा बनविला. त्याचा भाजपला अपेक्षित असाच परिणाम झाला असला तरी भाजपने  केलेल्या सर्वेक्षणापेक्षा कमी जागा मिळाल्या असून नोटाबंदीमुळे जनतेला होत असलेल्या त्रासामुळे हे झाले असावे, असेही काही  नेत्यांचे मत असल्याचे समजते. गेल्या  निवडणुकीत भाजपकडे २९८ जागा होत्या. आता  जागा तिप्पटीने वाढल्या आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नगराध्यक्षांचा विचार करता भाजपचे ५२ नगराध्यक्ष स्वबळावर तर ५-६ ठिकाणी भाजप सहयोगी पक्षाचे नगराध्यक्ष आहेत. भाजप-शिवसेना युतीचा विचार केल्यास ८० नगराध्यक्ष युतीचे आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पराभवानंतर राणे यांचे टीकास्त्र

कोणत्याही निवडणुकीतील पराभवानंतर त्याचे खापर पक्षाच्या नेतृत्वावर फोडण्याची परंपरा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कायम ठेवली आहे. वशिल्याने पदांचे वाटप बंद होत नाही तोपर्यंत यश मिळणे कठीण आहे, अशी खरमरीत टीका राणे यांनी केली असली तरी उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेत राणे सुद्धा होते याकडे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधले. मराठा समाजात तीव्र असंतोष असताना काँग्रेसने काहीच भूमिका घेतली नाही. काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व गंभीर नाही, अशी टीका करताना त्यांनी  चव्हाण यांच्यावर हल्ला चढविला. राणे यांनी नेतृत्वावर तोफ डागली असतानाच नगरमधील पक्षांतर्गत राजकारणातील वादातून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर आरोपबाजी केली. विखे-पाटील भाजपला अनुकूल अशी भूमिका घेतात, असा आरोपच थोरात यांनी केला.

राणे यांचा आरोप किंवा विखे-पाटील व थोरात यांच्यातील कलगीतुऱ्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.

भाजपने शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी वापरली नाही व पैशांचाही वापर केला नाही. उलट बिनपैशांची निवडणूक लढल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी  ही निवडणूक राज्य सरकारची कामगिरी, नोटा बंदीच्या पाश्र्वभूमीवर होती  त्याची प्रचिती या निकालांमधून आल्याचे दानवे यांनी सांगितले. पक्षाचे मुख्य प्रचारक हेलिकॉप्टर वापरत असतात. त्यावर व अन्य बाबींवर निवडणूक आयोगाचे लक्ष असते. त्यामुळे सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्याचा प्रश्नच नाही.

नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ता आणि पैशाच्या जोरावर भाजपने यश मिळविले असले तरी राज्यात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुढील काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता आम्हाला काम करावे लागेल, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. पैसे घेऊन पदवाटप करण्यात आल्यामुळे पक्षाचा पराभव झाल्याच्या  नारायण राणे यांच्या आरोपाबद्दल बोलताना पक्षात कधीच पैसे घेऊन पद वा तिकीट दिले जात नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने या निवडणुकांमध्ये सरकारी यंत्रणेचा वापर केला नाही, हेलिकॉप्टर वापरले नाही, पैसाही वापरला नाही, असा  टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला अप्रत्यक्षपणे लगावला आहे. राऊत यांनी  शिवसेनेला मिळालेल्या यशाबाबत समाधान व्यक्त केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या निवडणुकीच्या प्रचारात उतरले नाहीत. नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. उतरले.