News Flash

महापौरांनी जबाबदारी झटकणे अयोग्य ; भाजपकडून शिवसेना लक्ष्य

महापौर हे प्रथम नागरिक असतात. अशा दुर्घटनेवेळी त्यांनी जबाबदारी टाळून हात झटकणे योग्य नाही.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर

मुंबई : अंधेरीतील रेल्वेमार्गावरील पादचारी पुलाची जबाबदारी महानगरपालिकेची नसून रेल्वेची असल्याचे विधान मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केल्यानंतर विरोधी पक्षांबरोबरच भाजपमधूनही त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असून केवळ मुंबई महानगरपालिकेने रेल्वेला पैसे दिले म्हणून अशा दुर्घटनेवेळी हात झटकणे योग्य नाही, अशा शब्दांत भाजप नेत्यांनी महापौरांचे कान टोचले आहेत.

अंधेरीतील रेल्वेमार्गावरील पादचारी पुलाचा काही भाग मंगळवारी सकाळी कोसळल्यानंतर या पुलाच्या देखभालीसाठी मुंबई महानगरपालिका रेल्वेला पैसे देते त्यामुळे पुलाची जबाबदारी महानगरपालिकेची नाही तर रेल्वेची आहे, असा दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी महापौरांवर निशाणा साधला आहे.

महापौर हे प्रथम नागरिक असतात. अशा दुर्घटनेवेळी त्यांनी जबाबदारी टाळून हात झटकणे योग्य नाही. त्यातून मुंबईकरांना चांगला संदेश जात नाही, अशी टीका भाजपचे आमदार पराग आळवणी यांनी केली. आपण नगरसेवक असतानाच्या काळात पावसाळ्याच्या तयारीबाबत मुंबईचे महापौर बैठक घ्यायचे व त्यास रेल्वेसह मुंबईत काम करणाऱ्या विविध संस्थांचे अधिकारी येत असत. त्यात समन्वयाने काम होण्याच्या दृष्टीने निर्णय व्हायचे. मुंबईसारख्या शहरात ते गरजेचे आहे. पण आता महापौर महाडेश्वर हे रेल्वेवर जबाबदारी टाकून हात झटकत असतील तर ते दुर्दैवी आहे, असे आळवणी म्हणाले. दुसऱ्याकडे बोट दाखवून जबाबदारीतून मुक्त होता येईल असे कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे, असा टोला भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी लगावला.

ही दुर्घटना माझ्या मतदारसंघात घडली नसली तरी मुंबईतील एक खासदार म्हणून ही माझीही जबाबदारी आहे. मुंबई व परिसरातील रेल्वेमार्गावरील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात रेल्वेमार्गावरील पुलांच्या सुरक्षेचा विषय लोकसभेत उपस्थित करणार असल्याचेही सोमय्या म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 2:08 am

Web Title: bjp target mumbai mayor over andheri bridge collapse
Next Stories
1 यंत्रणांच्या जबाबदारीवरून राजकीय कलगीतुरा ; विरोधी पक्षांचा शिवसेनेवर हल्लाबोल
2 पुलांबाबत दोन दिवसांत अहवाल
3 राज्यात महानोकरभरती महावेगात!
Just Now!
X