मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी येणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या, १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत देशभर सेवा सप्ताह साजरा करण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने सोडला आहे. केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अमित शहा उद्या, १४ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत सेवा सप्ताहाचे उद्घाटन करणार आहेत.

स्वच्छता हीच सेवा, प्लास्टिकपासून मुक्ती आणि जल संरक्षण-संवर्धन हे तीन संकल्प भाजपने जाहीर केले असून सेवा सप्ताहाच्या निमित्ताने देशातील जनतेपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते संकल्प घेऊन संपर्क साधणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारने घेतलेले अनेक निर्णय आणि सरकारच्या योजना या सप्ताहाच्या निमित्ताने जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. जगातील सर्वात मोठी वित्तीय समायोजन योजना ठरलेल्या जनधन योजनेच्या माध्यमातून गरीबांच्या आर्थिक सबलीकरणाचे प्रयत्न, लहान व्यावसायिकांना वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय, देशातील घराघरांमध्ये तसेच सार्वजनिक शौचालये बांधण्यास प्रोत्साहन, आदी बाबी जनतेसमोर मांडण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.