शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडवणाऱ्या शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने आज (दि.१८) सकाळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर काळी गुढी उभारली.

शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. परिषदेचे सुभाष अंभोरे, बी. डी. घेरडे, प्रा. नरेंद्र पाठक व अन्य कार्यकर्ते आज सकाळीच तावडेंच्या बंगल्यावर आले होते. त्या सर्वांनी तावडे यांच्या बंगल्याच्या आवारात घुसून मुख्य दरवाज्यात काळी गुढी उभाली आणि निषेध व्यक्त केला.