News Flash

२०० हॉटेल्सविरुद्ध कारवाईचा बडगा

मुंबईतील सुमारे २०० उपाहारगृहांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला.

२०० हॉटेल्सविरुद्ध कारवाईचा बडगा
मुंबई महानगर पालिका

कुर्ला येथील ‘सिटी किनारा’मध्ये सिलिंडर स्फोटात आठ जण मृत्युमुखी पडल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिकेने नियम धाब्यावर बसविणाऱ्या उपाहारगृहांविरुद्ध मंगळवारी दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरू ठेवली होती. मुंबईतील सुमारे २०० उपाहारगृहांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला.

त्यात दिल्ली दरबार, जिप्सी, कोहिनूर, कैलास परबत आदी बडय़ा हॉटेल्सचा समावेश आहे. परळ येथील केईएम रुग्णालयासमोरील ग्रीष्मा रेस्टॉरंटने केलेल्या अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करण्यास गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांवर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. या प्रकरणी हॉटेलमालकाविरुद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कुर्ला येथील दुर्घटनेनंतर पालिका अजाय मेहता यांनी तात्काळ मुंबईतील श्रेणी-१ व श्रेणी-२ मधील हॉटेल्सची तपासणी करण्याचे आदेश
अग्निशमन दल, अनुज्ञापन विभाग, सार्वजनिक आरोग्य खाते आणि परिरक्षण खात्याला दिले. त्यानुसार सोमवारपासून मुंबईत हॉटेल्सच्या

तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारीही ही मोहीम सुरू होती. परवानगीशिवाय केलेले बांधकाम, अंतर्गत बदल, उपाहारगृहाबाहेर अनधिकृतपणे ठेवण्यात आलेले साहित्य, सिलिंडरचा अतिरिक्त साठा आदींविरुद्ध आजही कारवाई करण्यात आली. पालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील शालिमार, दिल्ली दरबार, लाइम अ‍ॅण्ड स्पाई, नानुमल भोजनालय, ‘डी’ विभागातील न्यू ग्रॅण्ट हॉटेल, ‘एफ-उत्तर’ विभागातील गुरुकृपा ढाबा, पंजाबी ढाबा, सरदार पायावाला, ‘जी-दक्षिण’ विभागातील कोहिनूर हॉल अ‍ॅण्ड बँक्वेट, डॉमिनोज पिझ्झा, ‘जी-उत्तर’ विभागातील जिप्सी रेस्टॉरंट, जिप्सी कॉर्नर, चंद्रगुप्त, चायना स्पाइस, ‘पी-उत्तर’ विभागातील एम. एम. मिठाईवाला यांच्याविरुद्ध पालिकेने कारवाई केली. यापैकी काही हॉटेल्सने पदपथावर अतिक्रमण केले होते, तर काहींनी परवानगीविना अंतर्गत बदल केले होते.

पदपथांवरील फेरीवाल्यांवर कारवाई

न्यायालयाने आदेश दिले असतानाही मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पदपथांवर खाद्यपदार्थ बनवून त्यांची सर्रास विक्री सुरू आहे. पालिकेने आता उपाहारगृहांबरोबरच पदपथांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्धही कारवाई सुरू केली आहे. भायखळा, परळ, अंधेरी, बोरिवली आदी विभागांमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या स्टॉलवर कारवाई करीत पदपथ मोकळे करण्यात आले. या कारवाईदरम्यान पालिकेने स्वयंपाकाचे ६३ गॅस सिलिंडर जप्त केले. त्याचबरोबर रॉकेल, कोळशावर चालणाऱ्या शेगडय़ाही पालिका अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या.
गॅस कंपनीवर कारवाई होणार
पदपथांवरील अनधिकृत स्टॉल्सना स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या गॅस कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजय मेहता यांनी घेतला आहे. पालिकेने जप्त केलेल्या गॅस सिलिंडरविषयी संबंधित गॅस कंपनीकडे चौकशी करण्यात येऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2015 5:53 am

Web Title: bmc action against 200 restaurant for violation law
टॅग : Bmc
Next Stories
1 तराफ्यातून प्रवासाचा जीवघेणा शॉर्टकट
2 श्रीमंतांच्या भल्यासाठी पालिका प्रसूतिगृहाच्या इमारतीला ‘रिकामपण’!
3 दांडियातही जॅकेटचा ‘गरबा’
Just Now!
X