गरीब घरच्या मुलांच्या शिक्षणाचा वसा उचलणाऱ्या महापालिकेच्या शिक्षण विभागाचा आगामी वर्षांचा अर्थसंकल्पात सरत्या वर्षांच्या तुलनेत घसरगुंडी उडाली आहे. आगामी अर्थसंकल्पात तब्बल १६९.२१ कोटी रुपयांनी घट झाली आहे. आगामी वर्षांत विद्यार्थ्यांच्या हाती टॅब देतानाच त्यांचा पोषण आहार हिरावून घेण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी शिक्षण विभागाचा २,५०१.३५ कोटी रुपयांचा, ४६ लाख रुपये शिलकीचा २०१५-१६ चा अर्थसंकल्प शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांच्याकडे सादर केला. २०१४-१५ मध्ये शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प २६६०.४४ कोटी रुपये इतका होता. सरत्या वर्षांच्या तुलनेत आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पात १६९.२१ कोटी रुपयांनी घट झाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत केलेल्या घोषणेची पूर्तता प्रशासनाने पालिकेच्या अर्थसंकल्पात करून दाखविली आहे. पालिका शाळांतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात २९.२२ कोटी रुपये (प्राथमिक) व ५.१५ कोटी रुपये (माध्यमिक) अशी तरतूद करण्यात आली आहे. पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी पोषण आहार सुरू करण्यात आला होता. मात्र आगामी वर्षांत पोषण आहारासाठी एक छदामही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘पोषण आहारा’विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी वर्षांमध्ये १०० प्राथमिक व १२० माध्यमिक शाळांमध्ये व्हच्र्युअल क्लासरूम सुरू करण्यात येणार असून त्यासाठी अनुक्रमे ८.८६ कोटी रुपये व ८.८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. २०१५-१६ मध्ये १० नव्या शाळा बांधण्यात येणार असून त्यात दोन कायक्लॉन शेल्टरचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी २४८.२२ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. १७ कोटींची तरतूद करून शाळांमध्ये २०० संगणकीय प्रयोगशाळा उभारण्याचा, ७.२५ कोटी प्रस्तावित करून १४,७९१ पर्यावरणस्नेही बेंच व डेस्क उपलब्ध करण्याचा संकल्प अर्थसंकल्पात सोडण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपशिलाची नोंद ठेवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना (शाळा) लॅपटॉप आणि पेनड्राइव्ह देण्याचीही घोषणा प्रशासनाने केली आहे.

जलवहन व्यवस्थेच्या बळकटीसाठी
जलवहन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी मरोशी ते रुपारेल महाविद्याल, गुंदवली ते भांडुप संकुल, पवई ते वेरावली व पवई ते घाटकोपर, चेंबूर ते ट्रॉम्बे जलाशय आणि चेंबूर ते परेल (वडाळामार्गे) या बोगद्यांची कामे प्रगतिपथावर असून त्यासाठी ५१३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जुन्या तानसा जलवाहिन्या बदलण्यासाठी १५८ कोटी रुपये व पाण्याची गळती रोखण्यासाठी ८०.५० कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत.

मिठी नदीसाठी केवळ ३५ कोटी
मिठी नदीच्या कामासाठी अर्थसंकल्पात केवळ ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर मिठी नदीलगत मलनि:सारण वाहिन्या टाकणे आणि संलग्न कामांसाठी ९.६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अशी अत्यल्प तरतूद करून प्रशासनाने पर्यावरणमंत्र्यांचे आदेश धाब्यावर बसविले आहेत.

मुंबईचा कचरा तळोजाला जाणार
मुंबईतील देवनार, कांजूरमार्ग, मुलुंड येथील क्षेपणभूमीवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. परिणामी मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथे १२६ हेक्टर जागा संपादित करण्याचे आदेश सरकारने महापालिकेला दिले आहेत. यासाठी अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्यासाठी योजना उदंड!
अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ३,३५९ कोटी ७८ लाख एवढी भरीव तरतूद दाखविण्यात आली असून भांडवली कामांसाठी ७९८ कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. बारा नवीन दवाखाने आणि एक प्रसूतिगृह उभारण्यात येणार असून पालिकेच्या ५० दवाखान्यांमध्ये डेंग्यू निदानाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसूतिगृहांची दजरेन्नती तसेच बालरुग्णांसाठी नवीन खाटा, मधुमेह व रक्तदाब चिकित्सेसाठी आणखी २५ दवाखान्यांमध्ये व्यवस्था, प्रत्येक अपंग कुष्ठरुग्णांसाठी एक हजाराची आर्थिक मदत तसेच विविध आरोग्यसेवा एकाच छताखाली देण्यासाठी कस्तुरबा रुग्णालय परिसरात आरोग्य भवन उभारण्यासाठी पन्नास लाखांची तरतूद करण्यात आली आहे. जन्म-मृत्यू नोंदणीचा अभिलेखा एकाच ठिकाणी जतन करण्यासाठी अ‍ॅक्वर्थ रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. उपनगरीय रुग्णालयांचे काम प्रगतिपथावर असून एक हजार खाटांच्या भगवती रुग्णालयाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरू आहे. आगामी वर्षांत जोगेश्वरी येथील सर्वसाधरण रुग्णालयात रक्तपेढी सुरू करणे, राजावाडी रुग्णालयात मानवी दुग्धपेढी, योगा थेरपी सेंटर, महिलांवरील अत्याचाराच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी निर्भय केंद्र योजना राबविण्यात येणार आहेत. याशिवाय एमआरआय, सीटी स्कॅनसह अत्यावश्यक यंत्रसामग्री खरेदी प्रस्तावित असून कुपर रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रकल्पाचे कामही प्रगतिपथावर असल्याचे नमूद केले आहे.

घनकचरा, सांडपाण्यासाठी भरीव तरतूद
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार भांडवली प्रकल्प कामासाठी करण्यात येणाऱ्या तरतुदीच्या २५ टक्के रक्कम घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रकल्पासाठी राखून ठेवण्यात आली आहे. २०१५-१६च्या अर्थसंकल्पात ११,८२४.९८ कोटी रुपये भांडवली प्रकल्पाच्या तरतुदींपैकी २,९६२.२१ कोटी रुपये घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रकल्पासाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. मलनि:सारण बोगद्यांच्या बांधकामांसाठी ११५ कोटी रुपये, जुन्या मलनि:सारण उदंचन केंद्रांसाठी २७.७० कोटी रुपये, तर सांडपाणी प्रक्रिया केंद्र व वर्सोवा सांडपाणी उदंचन केंद्राच्या उभारणीसाठी ३२ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली.