थुंकणे, कचरा टाकणे याप्रकरणी दोन महिन्यांत दीड कोटींची दंडवसुली; ‘क्लीनअप मार्शल’ योजनेचा फायदा

शहर स्वच्छ ठेवण्याचे मुख्य उद्दिष्ट असलेल्या क्लीनअप मार्शल योजनेमुळे महानगरपालिकेच्या तिजोरीत दोन महिन्यांत दीड कोटी रुपयांची भर पडली आहे. कचरा टाकणे, थुंकणे या प्रकारणी दंड आकारणीत तब्बल ७७ हजार जणांकडून १ कोटी ६८ लाख रुपये गोळा झाले आहेत.

ऑगस्टपासून सुरू झालेल्या या मोहिमेत बी वॉर्ड वगळता प्रत्येक वॉर्डमध्ये सुमारे ३० मार्शलची नेमणूक करण्यात आली.  जुलै महिन्यात ताकीद देऊन सोडण्यावर भर देणाऱ्या क्लीनअप मार्शलनी ऑगस्टमध्ये दंडाचा दट्टय़ा फिरवणे सुरू केले आहे. जुलैमध्ये सुमारे ३० हजार जणांकडून ६५ लाख दंड गोळा करण्यात आला होता. तर ऑगस्टमध्ये ४७ हजार जणांवर कारवाई करत एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली.  बी वॉर्डमधील मार्शलची नेमणूक पोलीस पडताळणीमुळे प्रलंबित आहे.

बोरिवलीत क्लीनअप मार्शलनी दोन महिन्यांत १०,०५४ जणांना सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ करताना पकडले असून त्यांच्याकडून २१ लाख ८१ हजार रुपयांचा दंड घेण्यात आला. सीएसटी, चर्चगेट स्थानकांजवळील परिसरात ७ हजार ९६५ जणांना दंड ठोठावण्यात आला. ग्रॅण्ट रोड परिसरात त्या मानाने परिसर अस्वच्छ करण्याचे प्रमाण कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसते. दोन महिन्यांत या परिसरात ६६ हजार रुपये दंड आकारण्यात आला.

जुलै महिन्यात केवळ लोकांना समज देऊन सोडण्याच्या सूचना केल्या होत्या. ऑगस्टमध्ये कारवाई सुरू झाली. मात्र दंडांची रक्कम फुगण्यापेक्षा लोकांनी स्वच्छता पाळली तर आम्हाला बरे वाटेल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

धाकदपटशामुळे क्लीनअप मार्शलवर दोन वर्षांपूर्वी जोरदार टीका करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन महिन्यांत क्लीनअप मार्शलविरोधात तक्रार आली नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दंड भरण्यास नकार देणाऱ्या किंवा शिवीगाळ करणाऱ्याला नजीकच्या पोलीस स्थानकात घेऊन जाता येते. मात्र एवढी वेळ आलेली नाही. क्लीनअप मार्शलविरोधात स्थानिक वॉर्ड कार्यालयातील साहाय्यक अभियंत्याकडे तक्रार करता येईल. तिथेही तक्रार निवारण झाले नाही तर साहाय्यक आयुक्त व त्यानंतर उपायुक्तांकडे दाद मागता येईल.

पालिकेकडून दंडवसुली

रस्त्यावर शौचास बसणे – १०० रुपये

कचरा टाकणे, थुंकणे, लघवी करणे, कपडे किंवा भांडी धुणे – २०० रुपये

पाळीव प्राण्यांकडून रस्त्यांवर घाण होणे, कचराकुंडी न ठेवलेला दुकानदार – ५०० रुपये

गाडी धुणे, मांसमच्छीचा कचरा वेगळा न करणे – १००० रुपये