दुसऱ्या लाटेत मुंबईमध्ये करोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. पहिल्या लाटेचे आकड्यांचा विक्रमही मोडीत निघाला असून, मुंबईत दिवसाला अडीच हजार ते तीन हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहे. दुसरीकडे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार आणि महापालिकेकडून सातत्याने करोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, तरीही काही लोक बेजबाबदार वर्तन केलं जात असून, विनामास्क फिरणाऱ्या २० लाख लोकांवर महापालिकेनं कारवाई केली आहे.

मुंबई महापालिकेनं एप्रिल २०२० ते २१ मार्च २०२१ पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. या कालावधीत विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या २० लाख लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. या २० लाख लोकांकडून महापालिकेनं तब्बल ४० कोटी रुपये इतका दंड वसूल केला आहे. एकिकडे ‘मी जबाबदार’ अशी मोहीम सरकारकडून राबवली जात असताना अनेकजण सरकारच्या आवाहनाला हरताळ फासत असल्याचंच या आकडेवारीतून समोर आलं आहे.

मुंबईतील सध्याची स्थिती कशी?

करोना रुग्णवाढीचा उच्चांक कायम असून शहरात रविवारी ३,७७५ रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे. मुंबईत संसर्ग प्रसार वेगाने होत असून, रुग्णदुपटीचा कालावधी आठवडाभरात १८६ दिवसांवरून १०६ दिवसांवर आला आहे. रविवारी मुंबईत १० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नऊ जण ६० वर्षांवरील होते, तर सात रुग्णांना दीर्घकालीन आजार होते.

मुंबई शहरात सध्या २३ हजार ४४८ रुग्ण उपचार घेत असून, बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्के आहे. रविवारी १६४७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मागील चोवीस तासांत बाधितांच्या संपर्कातील २१ हजार २०८ जणांचा शोध घेण्यात आला आहे. शहरात सध्या ३१६ सोसायट्या रुग्ण आढळल्याने सील करण्यात आल्या आहेत. तर प्रतिबंधित चाळी आणि झोपडपट्ट्यांची संख्या ४० वर गेली आहे.