संदीप आचार्य 
मुंबईत आता ३५ हजारांहून जास्त करोना रुग्ण आढळून आले असून आगामी पंधरा दिवसात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढण्याची भीती आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी करोना रुग्ण संपर्क साखळी तोडण्याचं आव्हान स्वीकारले आहे. आयुक्तांनी स्वीकारलेले हे आव्हान म्हणजे अभिमन्यूने चक्रव्युहात शिकण्यासारखे असल्याचे पालिका अधिकारी व डॉक्टरांचे म्हणणे आहे.

करोनाला अटकाव करायचा असेल तर करोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांना क्वारंटाइन करणे गरजेचे आहे. साधारणपणे एक करोना रुग्ण दहा ते पंधरा लोकांच्या संपर्कात येऊ शकतो हे लक्षात घेऊन आयुक्त चहेल यांनी करोनाची साखळी तोडण्यासाठी एका करोना रुग्ण मागे १५ संपर्क व्यक्तींना शोधण्याचे आदेश पालिका विभाग अधिकार्यांना दिले आहेत. मुंबईतील २४ विभागातील संबंधित अधिकारी आता या कामाला लागले असले तरी कर्मचारी थकलेले आहेत शिवाय रुग्णाच्या संपर्कातील एवढ्या लोकांना शोधण्यासाठी विशेष प्रशिक्षित माणूस असणे गरजेचे आहे. सध्या आमच्याकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ एकाचवेळी अनेक कामात गुंतून पडलेले असताना आता करोना रुग्णांच्या संपर्कातील पंधरा व्यक्ती शोधणं हे खरच मोठं आव्हान आहे, असे सहाय्यक पालिका आयुक्तांचे म्हणणे आहे.

“मुंबईत करोनाचा शिरकाव झाला तेव्हा परदेशातून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोक शोधून क्वारंटाइन केले जात होते. पुढे परिस्थिती बदलत गेली. मुंबईच्या कानाकोपऱ्यात रुग्ण सापडू लागले. धारावीच्या झोपडपट्टीपासून वरळीचे मोठे आव्हान निर्माण झाले आणि यंत्रणेची दिशाच काही काळ बदलली. करोना रुग्ण वेगाने शोधणे व रुग्णालयात दाखल करणे याला प्राधान्य आले. यातून रुग्णालयातील खाटा वाढवणे व लक्षणे नसलेल्या लोकांना क्वारंटाइनची व्यवस्था निर्माण करण्यावर जोर देण्यात आला. या सर्वात करोनाची साखळी तोडली पाहिजे याची जाणीव होती तथापि प्राधान्यक्रम रुग्ण व्यवस्थापनाला देण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता” असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. “करोनाची साखळी तोडण्यासाठी पहिल्यापासून संपर्कातील लोक शोधत होतो पणे ते काम एवढे सोपे नव्हते. प्रामुख्याने झोपडपट्टीत संपर्क शोधून व्यवस्थापन करणे हे एक आव्हान होते”, असे डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी करोनाची साखळी तोडण्यासाठी संपर्कातील पंधरा लोक शोधण्याची घेतलेली भूमिका योग्य असल्याचे सहआयुक्त रमेश पवार यांनी सांगितले. आता रुग्णालयातील खाटा वाढविण्याचे काम तसेच अतिदक्षता विभागात खाटा वाढविण्याच्या कामाला वेग आला आहे. “खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा पालिकेच्या ताब्यात आहेत तसेच बीकेसी, वरळी, महालक्ष्मी, गोरेगाव, मुलुंड ते दहिसर पर्यंत पालिकेने तात्पुरती रुग्णालये उभारली आहेत. यात लक्षणे असलेल्या व ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना दाखल करून उपचार केले जातील. त्याचबरोबर संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यासाठी जूनपर्यंत एक लाख खाटांची व्यवस्था झालेली असेल” असेही रमेश पवार म्हणाले. “अशावेळी करोनाचा सामना करण्यासाठी संपर्कातील लोक शोधून साखळी तोडावीच लागेल, असेही सहआयुक्त पवार म्हणाले. हे मान्य आहे की, विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकाच वेळी अनेक कामे करावी लागतात व आमचे लोक गेले दोन महिने अविश्रांत काम केल्यामुळे निश्चितच थकले आहेत. परंतु आता आम्हाला थकायचे नाही तर करोनाला थकवायचे आहे”, असेही रमेश पवार म्हणाले. धारावी सारख्या विभागात कपोना संपर्कातील लोक शोधणे हे आव्हान आहे मात्र जास्तीतजास्त लोक शोधून मुंबईवरचे हे करोनाचे संकट दूर करण्यासाठी पालिकेचा प्रत्येक कर्मचारी झटत असल्याचे रमेश पवार यांनी सांगितले.

मुंबईसाठी नेमलेल्या डॉक्टरांच्या कृतादलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्या म्हणण्यानुसार पालिका सध्या दोन प्रकारे काम करत आहे. एक करोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे आणि दुसरे म्हणजे संभावित रुग्ण शोधणे. यासाठी मोठ्या प्रमाणात पालिकेने स्क्रिनिंगचे काम हाती घेतले आहे. जवळपास ५४ लाख लोकांचे स्क्रिनिंग आतापर्यंत करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात संभावित रुग्ण यात शोधून काढण्यात आले. ज्यांचे वय ५५ पुढील असून त्यांना कोमॉर्बीडिटी आहे. वेळीच हे रुग्ण शोधल्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचवता आल्याचे डॉ. संजय ओक यांनी सांगितले. धारावीत शांतीलाल जैन यांच्या माध्यमातून मिळालेल्या ४० रुग्णवाहिकांच्या माध्यमातून तसेच स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने आज धारावी पिंजून काढण्याचे काम सुरू असल्याचेही डॉ. ओक यांनी सांगितले. त्याचवेळी करोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे चक्रव्युह भेदण्यासारखे असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईची लोकसंख्या, पसरलेली झोपडपट्टी , तेथील लोकांची मानसिकता तसेच सोसायट्यांमधील लोकांची मानसिकता आणि पालिकेच्या विभाग कार्यालयातील उपलब्ध कर्मचारी याचा विचार करता एका करोना रुग्ण मागे चार ते सहा पेक्षा जास्त संपर्कातील लोक शोधणे शक्य नसल्याचे पालिकेच्या विभाग कार्यालयातील अधिकारी व सहाय्यक पालिका आयुक्तांचे म्हणणे आहे. करोना रुग्णांच्या संपर्कातील लोक शोधण्यासाठी संबंधित रुग्णाला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारावे लागतील. यासाठी एका रुग्णामागे किमान एक तास वेळ द्यावा लागेल व रुग्णाची मानसिकता एवढा वेळ देण्याची नाही.

शिवाय आमचे कर्मचारी त्यासाठी विशेष प्रशिक्षित नसून प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे झोपडपट्टी विभागात रुग्णाची याबाबत सहकार्य करण्याची मानसिकता नसल्याचे एका सहाय्यक पालिका आयुक्तांनी सांगितले. पालिका आयुक्तांनी एका रुग्णामागे पंधरा संपर्कातील लोकांना शोधण्याचे आदेश दिले असले तरी गेल्या काही दिवसातील आकडेवारीचा विचार करता सरासरी चार ते पाच संपर्कातील लोकांनाच शोधता येत असल्याचे दिसून येत आहे.