३० सप्टेंबरपासून नामनिर्देशन

मुंबई : पालिकेच्या स्थायी, बेस्ट, सुधार आणि शिक्षण या चार वैधानिक समित्या, विशेष समित्या व प्रभाग समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होणार असून ३० सप्टेंबरपासून नामनिर्देशने भरण्यास सुरुवात होणार आहे. या समित्यांच्या निवडणुका दृक्श्राव्य माध्यमातून घेण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

दरवर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या पालिकेच्या स्थायी, बेस्ट, सुधार आणि शिक्षण या चार वैधानिक समित्या तसेच स्थापत्य (शहर व उपनगर), विधी, आरोग्य, महिला व बालकल्याण, बाजार व उद्यान या विशेष समित्यांच्या तसेच १८ प्रभाग समित्यांच्या निवडणुका यंदा करोना आणि टाळेबंदीमुळे होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या समितीच अद्यापपर्यंत कार्यरत आहेत. मात्र आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना समित्यांच्या निवडणुका घेण्यास राज्य सरकारने परिपत्रकाद्वारे मंजुरी दिली आहे. त्यामुळे पालिकेने आपला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे कोणत्या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबतच्या घडामोडींना आता वेग येणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रथमच या समित्यांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व आहे.

समित्यांमधील अनेक सदस्यांचा दोन वर्षांचा कालावधी संपलेला आहे. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नेमणूक होणे गरजेचे आहे.  त्यामुळे स्थायी समितीवर कोणते नवे चेहरे येतात तेदेखील समजू शकेल.

निवडणुकांचे वेळापत्रक

* शिक्षण व स्थायी समिती      ५ ऑक्टोबर

*   बेस्ट आणि सुधार समिती ६ ऑक्टोबर

*   स्थापत्य शहर आणि उपनगर      ७ ऑक्टोबर

*   सार्वजनिक आरोग्य आणि बाजार व उद्यान समिती  ८ ऑक्टोबर

*   विधी आणि महिला व बालकल्याण समिती ९ ऑक्टोबर

*    प्रभाग समित्या   १४ ते १६ ऑक्टोबर