आझाद मैदानावरील महानगरपालिकेच्या हजारो कंत्राटी सफाई कामगारांची व्यथा

न्यायालयाने काम देण्याचे आदेश पालिकेला दिले. पण पालिका न्यायालयालाही जुमानत नाही. गेले सात-आठ महिने आम्हाला काम दिलेले नाही. दररोज पालिका कार्यालयात जायचे आणि तिथल्या रखवालदाराने आम्हाला हाकलून द्यायचे, हा प्रकार आता नित्यचाच झाला आहे. हाताला काम नाही, घराची चूल पेटत नाही, कच्च्याबच्च्यांच्या पोटाची खळगी भरणेही अवघड झाले आहे. भिक मागता येत नाही आणि पालिका काम देत नाही. आता आम्हालाही सुमतीच्या पावलावर पाऊल टाकून गळफास लावून घेण्याची वेळ पालिकेने आमच्यावर आणली आहे.. आझाद मैदानावर जमलेल्या हजारो कंत्राटी सफाई कामगार महिलांनी अश्रू ढाळत आपल्या वेदनांना वाट मोकळी करुन दिली.

विलेपार्ले येथील नेहरू नगरमध्ये सुमती देवेंद्र ही २७ वर्षांची कंत्राटी सफाई कामगार आपल्या ११ वर्षांच्या मुलीसोबत राहात होती. पतीचा आधार नसल्यामुळे ती एकटीच आपल्या मुलीचे पालनपोषण करीत होती. सुमती अंधेरी पश्चिमेच्या काही भागात साफसफाई करुन आपला आणि मुलीचा उदरनिर्वाह करीत होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पालिकेने तिला काम देणे बंद केले होते. दररोज ती पालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभागात जायची. काम मिळावे म्हणून बराच वेळ ताटकळत उभी राहायची. पालिका अधिकाऱ्यांनी फटकारल्यानंतर ती माघारी फिरायची. काम मिळू न शकल्यामुळे मुलीची होणारी उपासमार तिला बघवत नव्हती. अखेर तिने बुधवारी घरामध्येच गळफास लावून आत्महत्या केली. सुमतीचे पार्थिव पालिका मुख्यालयात आणणार हे समजताच तिच्या सफाई कामगार मैत्रिणींनी धावतपळत दुपारी आझाद मैदान गाठले.

पतीचा आधार नसल्यामुळे सुमती एकाकी पडली होती. पण मुलीला शिकवून मोठी करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती जिद्दीने उभी राहिली होती. कंत्राटी सफाई कामगार म्हणून ती पालिकेत काम करत होती. मात्र पालिकेने कंत्राटी कामगारांना अचानक कामावरुन कमी आणि उभयतांमधील वाद विकोपाला गेला. सफाई कामगारांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढून न्याय मिळविला. या कंत्राटी कामगारांना काम देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. काम नसल्याचा बहाणा करुन या कंत्राटी कामगारांना अधूनमधून काम देणे बंद करण्यात आले. यामुळे हे कामगार अडचणीत येऊ लागले. अंधेरी भागातील काही रस्त्यांची यांत्रिक झाडूच्या माध्यमातून सफाई करण्यास पालिकेने सुरुवात केली आणि या भागातील सात युनिटमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसलली. या कामगारांपैकीच एक सुमती.

काम मिळत नसल्यामुळे गेले काही दिवस सुमती विमनस्क अवस्थेत होती. घरी अठराविश्वे दारिद्रय़ असल्याने ती प्रचंड विवंचनेत होती. अखेर तिने आत्महत्या केली. आम्हालाही गेल्या सात-आठ महिन्यांपासून काम मिळालेले नाही. काम मिळेल या आशेने आम्ही दररोज सकाळी पालिकेच्या कार्यालयात जातो. पण आम्हाला काम दिले जात नाहीच, उलट पालिकेचा रखवालदार आम्हाला हाकलून देतो.

शुल्क भरायचे कसे?: काम मिळत नसल्याने मुलांची शाळेची फि भरणे उवघड बनले आहे. दुपारी आणि संध्याकाळी मुलांना खायला काय द्यायचे असा प्रश्न भेडवू लागला आहे. उपासमार, अवहेलना यामुळे सुमतीप्रमाणेच आम्हीही कंटाळलो आहोत. अशीच परिस्थिती राहिली तर आम्हालाही सुमतीच्या पावलावर पाऊल ठेऊन गळफास लावून घ्यावा लागेल, अशी खंत सुशीला डोळ्यात आसवे आणून सांगत होती. इतर महिला सफाई कामगार सुशीलाच्या सूरात सूर मिसळून आपली व्यथांना वाट मोकळी करुन देत होत्या. त्यामुळे सुमतीच्या पार्थिवाच्या प्रतीक्षेत असलेल्या असंख्य सफाई कामगारांना अश्रू आवरणे अवघड बनले होते.