पावसाळ्यात सखलभाग जलमय करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या नाल्यांलगतच्या झोपडय़ा हटविण्यास पालिकेने गुरुवारपासून सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात वांद्रे येथील राहुल नगर नाल्यावरील तब्बल ७० झोपडय़ा गुरुवारी हटविण्यात आल्या असून ही कारवाई शुक्रवारीही सुरू राहणार आहे. नाला अतिक्रमणमुक्त झाल्यानंतर त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.
मुंबईमधील नाल्याकाठी अनेक झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या आहेत. या झोपडपट्टीतील रहिवाशी नाल्यामध्येच कचरा टाकत असून नाले कचऱ्याने तुडुंब भरत आहेत.
अनधिकृत बांधकामे आणि साचणारा कचरा नाल्यांच्या प्रवाहात अडथळा ठरत आहे. त्यामुळे नाल्याजवळचे आसपासचे सखलभाग जलमय होतात. नाल्यात साचलेला कचरा बाहेर काढण्यासाठी लगतच्या झोपडय़ांचा अडथळा निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आता नाल्यावरील झोपडपट्टय़ा हटविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. वांद्रे येथील राहुल नगरमधून जाणाऱ्या राहुल नगर नाल्याकाठी तब्बल १२५ अनधिकृत झोपडय़ा उभ्या असून पोलीस बंदोबस्तात त्या हटविण्याचे काम पालिकेने गुरुवारी हाती घेतले.
दिवसभरात तब्बल ७० झोपडय़ा हटविण्यात आल्या असून उर्वरित झोपडय़ांविरुद्ध शुक्रवारी कारवाई करण्यात येणार आहे. पालिकेचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता राजेश यादव, दुय्यम अभियंता दिनेश भोसले, कनिष्ट अभियंता अमित पोवार, विक्रांत णियार व सुशांत बागल आदी ही कारवाई करीत आहेत.