मास्क, सॅनिटायझरशिवायच करोनाग्रस्त शोधण्याच्या मोहिमेवर

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या प्रादुर्भावामुळे धास्तावलेल्या मुंबई महापालिका प्रशासनाने आपल्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची फौज जनजागृती आणि बाधितांच्या शोधार्थ रवाना केली असली तरी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत मात्र सावळा गोंधळच आहे. घरोघरी जाऊन करोनाची माहिती देतानाच रुग्णांचा शोध घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर्स आदी देण्यात आलेले नाही. परिणामी, आपले आरोग्यच धोक्यात येण्याच्या भीतीने हे कर्मचारी धास्तावले आहेत.

करोनाविषयी जनजागृती आणि बाधितांचा शोध घेण्याची व्यापक मोहीमही पालिकेने हाती घेतली आहे. या कामासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. त्याचबरोबर या पथकांच्या मदतीसाठी आरोग्य स्वयंसेविकांची फौजही उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक विभाग कार्यालयामधील आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकारी, तीन डॉक्टर, अन्य कर्मचारी; पालिकेच्या आरोग्य केंद्रामधील डॉक्टर, परिचारिका, तीन परिसेविका (एएनएम), तीन समन्वयक, २० आरोग्य स्वयंसेविका असा फौजफाटा या मोहिमेत कार्यरत आहे. पालिकेचे २४ विभाग कार्यालये आणि २२५ आरोग्य केंद्रांमधील ही मंडळी करोनाविषयी जनजागृती आणि बाधितांचा शोध घेत फिरत आहेत. मात्र या मंडळींना करोना विषाणूची बाधा होऊ नये या दृष्टीने सुरक्षेच्या कोणत्याच वस्तू देण्यात आलेल्या नाहीत. मास्क वा सॅनिटायझरशिवायच ही मंडळी घरोघरी फिरून नागरिकांच्या आरोग्याची चौकशी करीत आहेत.

मुंबईमधील अनेक विद्यार्थी परदेशांमध्ये शिक्षण घेत आहेत. मात्र त्या देशात करोनाचा प्रभाव जाणवू लागल्यामुळे हे विद्यार्थी मायदेशी परतू लागले आहेत. पालिकेच्या आरोग्य खात्याच्या पथकांना असे अनेक विद्यार्थी मुंबईत दाखल झाल्याचे निदर्शनास आले आहेत. हे विद्यार्थी आपल्या घरात मास्कविनाच फिरत असून त्यांची तातडीने करोनाविषयक चाचणी करणे गरजेचे आहे. अशा विद्यार्थ्यांशी वा त्यांच्या पालकांशी संवाद साधताना जनजागृती वा रुग्णांचा शोध घेणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांच्या पथकांची सुरक्षा धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. या प्रकारामुळे पथकांतील कर्मचारीही धास्तावले आहेत. करोनाची बाधा टाळण्यासाठी तातडीने आपल्याला मास्क, सॅनिटायझर आदी वस्तू उपलब्ध कराव्या, अशी मागणी या पथकांतील कर्मचाऱ्यांकडून होऊ लागली आहे. या संदर्भात पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

प्रवेश कसा मिळेल?

पथकातील कर्मचारी मास्क लावून जनजागृतीसाठी वा बाधितांचा शोध घेण्यासाठी गेल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कदाचित नागरिक त्यांना चौकशीसाठी इमारतीमध्ये प्रवेश नाकारतील. त्यामुळे जनजागृती आणि करोनाबाधितांच्या शोधमोहिमेत मोठा अडथळा येऊ शकेल, असे एका अधिकाऱ्याने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.