करोनाचा धोका टळल्यामुळे महापालिकेचा निर्णय

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाचे रुग्ण वाढल्याने प्रतिबंधित करण्यात आलेल्या मुंबईतील ८१३ ठिकाणांपैकी ८३  ठिकाणे वगळण्यात आली आहेत. या क्षेत्रांतील करोनाबाधितांची प्रकृती सुधारल्यामुळे तसेच करोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे त्यांना प्रतिबंधित क्षेत्रांतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याचे वास्तव्य असलेली इमारत वा परिसर प्रतिबंधित करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. अन्य व्यक्तींना संसर्ग होवू नये या काळजीपोटी हा निर्णय घेण्यात आला आहे.  आजघडीला तब्बल ८१३ ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत. प्रतिबंधित केलेल्या इमारतीमधील वा परिसरातील नागरिकांना आपल्या घराबाहेर पडता येत नाही. तेथील रहिवाशांना आपल्या घरातच विलगीकरणात राहावे लागते. विलगीकरणात राहणाऱ्यांची चाचणी करण्यात येत आहे. तसेच बाहेरच्या व्यक्तीला प्रतिबंधित इमारत वा परिसरात प्रवेश मनाई आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, जेवण वा वैद्यकीय सुविधा पालिकेकडून उपलब्ध करण्यात येत आहेत.

मुंबईत करोनाचा संसर्ग वाढत असला तरी दुसरीकडे रुग्णालयातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. रुग्ण बरा होऊन घरी गेल्यानंतर, तसेच त्या परिसरात अन्य कोणालाही बाधा नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, तसेच धोका टळल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित इमारत वा परिसर प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात येत आहे. आतापर्यंत पालिकेने ८३ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून वगळली आहेत. मात्र या ठिकाणच्या रहिवाशांना काळजी घेण्याचे निर्देश पालिकेकडून देण्यात आले आहेत, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. पालिकेच्या एप-दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीतील लालबाग, चिंचपोकळी, परळ, नायगाव, शिवडी, काळाचौकी या परिसरातील तब्बल ३१ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून वगळण्यात आली आहेत.