मुसळधार पावसात दरड कोसळून माळीण गावात झालेली दुर्घटना अंधेरी येथील गिल्बर्ट हिलजवळही होऊ शकेल. या टेकडीला वाचवण्याऐवजी तिच्या आजुबाजूला वाढलेल्या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महानगरपालिकेला जागे करणारे पत्र स्थानिक नगरसेवकाने आयुक्त सीताराम कुंटे यांना पाठवले आहे.
ज्वालामुखीच्या उद्रेकातून सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी तयार झालेल्या २०० फूट उंचीच्या बेसाल्टची ही टेकडी आहे. जागतिक वारसा स्थळ यादीत गिल्बर्ट हिलचा समावेश आहे. अंधेरी येथील या भागाची महानगरपालिकेनेही दुसऱ्या श्रेणीच्या पुरातन वारशांमध्ये नोंद केली आहे. अंधेरीतील टेकडीची गेल्या काही वर्षांत वेगाने झीज होत असून आजूबाजूला उभी राहत असलेली बांधकामे त्याला कारणीभूत आहेत. माळीणप्रमाणे दुर्घटना घडल्यास या खडकाच्या पायथ्याशी बेकायदेशीरपणे वाढवण्यात येत असलेल्या बांधकामाला आळा न घालणारी पालिका जबाबदार राहील. असा अपघात घडल्यास तो नैसर्गिक नसून मानवनिर्मित असेल, असेही साटम यांनी पत्रात म्हटले असून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.